वाशिम, दि. ९- राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणेच आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतनही थेट बँक खात्यात संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. ९ जानेवारीला मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दालनात वाशिम तालुक्यातील शिक्षकांच्या या वेतन प्रणालीवर अखेरचा हात फिरविण्यात आला. शासनाच्या कामकाजाला संगणक व ऑनलाइनची जोड दिली जात आहे. राज्य शासकीय कर्मचार्यांचे वेतन संगणक प्रणालीद्वारे केले जात असल्याने दरमहा वेळेत वेतन होत आहे. याचप्रमाणे शिक्षक संवर्गातील कर्मचार्यांचे वेतनसुद्धा थेट संगणक प्रणालीद्वारे होणे आवश्यक होते. महाराष्ट्रात केवळ सेवार्थ प्रणालीने राज्य शासकीय व जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांचे वेतन करण्यात येत होते. शिक्षक संवर्गाचे शालार्थ प्रणालीने वेतन करण्याकरिता दरमहा वेतनास विलंब होत होता. वेतनाचे प्रस्ताव तयार करून लेखा व वित्त विभाग आणि तेथून कोषागार कार्यालय असा कागदोपत्री प्रवास होता. कागदोपत्री होणार्या या प्रवासाला कुठेतरी थांबवून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पुढाकार घेतला. ९ जानेवारीला पंचायत समिती वाशिमच्या शिक्षकांचे वेतन प्रायोगीक तत्वावर ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याकरिता जिल्हा कोषागार अधिकारी एस.टी. गाभणे, शिक्षणाधिकारी जुमनाके, गटविकास अधिकारी रमेश भद्रोड, गटशिक्षणाधिकारी बाजड, शिक्षण विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी गजानन खुळे, कनिष्ठ लेखाधिकारी प्रवीण पंधारे, कनिष्ठ सहायक सतीश सरनाईक तसेच शिक्षक सुनील कोल्हे, केशव वैद्य, विश्वनाथ इढोळे यांनी याबाबत विशेष प्रयत्न करून शालार्थ प्रणालीद्वारे प्रायोगिक तत्त्वार एकूण १३६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ५८३ शिक्षकांचे डिसेंबर २0१६ चे वेतन करण्याची प्रक्रिया ९ जानेवारी रोजी केली. फेब्रुवारीपर्यंत उर्वरित सर्व पंचायत समितीत हा प्रयोग केला जाणार आहे.
शिक्षक वेतन प्रणाली आता ‘पेपरलेस’
By admin | Published: January 10, 2017 2:39 AM