लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी तयार केली असून, या यादीवर शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले आहेत. प्राप्त आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर सेवाज्येष्ठता यादी अंतिम केली जाणार आहे.शासन र्णियानुसार १ जानेवारी या दिनांकावर आधारीत कार्यरत शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करावी लागते. सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर यांच्याशी कास्ट्राईब संघटनेच्या पदाधिकाºयांनी आढावा सभेत प्रश्न उपस्थित केला होता. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निर्देशानुसार तात्पूर्ती सेवाज्येष्ठता यादी तयार करून गटशिक्षणाधिकाºयांकडे आक्षेप नोंदविण्यासाठी प्रसिद्ध केली. शिक्षकांनी यादी पाहून त्याची माहिती बरोबर असल्याची स्वाक्षरी केली नसल्याचे किंवा यादीवर एकही आक्षेप नोंदविला नसल्याचेही या आढावा सभेत समोर आले होते. सेवाज्येष्ठता यादी अंतिम होण्यासाठी प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापकांनी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालय किंवा केंद्रस्तरावर केंद्र प्रमुखांकडे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सेवाज्येष्ठता यादीचे वाचन करावे, ही यादी तपासून स्वत:ची माहिती बरोबर असल्याची खात्री करावी आणि चूक असल्यास आक्षेप नोंदवावे, असे आवाहन कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव वैद्य यांनी केले. आक्षेपांचे निराकरण झाल्यानंतर या सेवाजेष्ठता यादीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख पदोन्नती करणे शक्य होईल, असा दावाही करण्यात आला. चूकीच्या माहितीमुळे कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही, यासाठी शिक्षकांनी तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी काळजीपूर्वक तपासावी, अशा सूचना देण्यात आल्या. कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव वैद्य, सचिव हेमंत तायडे, वाशिम तालूकाध्यक्ष प्रभू मोरे, संतोष पट्टेबहादूर, सुभाष सरतापे, वामन मोरे यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.
शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अंतिम टप्प्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 3:53 PM