वाशिम: वेगवेगळी अशैक्षणिक कामे, सतत मागवली जाणारी वेगवेगळी ऑनलाईन माहिती, या प्रकारात प्राथमिक शिक्षक भरडले जात असून, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना ज्ञानदान कधी करावे, असा प्रश्न त्यांना पडत आहे. हे सर्व प्रकार थांबविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानाला विविध ११ शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता.
मागील काही दिवसांपासून राज्यभरातील शिक्षकांना वेगवेगळ्या अशैक्षणिक कामांत गुंतवले जात आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची ऑनलाईन माहिती वारंवार मागण्यात येत असून, वेगवेगळे ॲप त्यांना वापरावे लागत आहेत, यात शिक्षक भरडले जात असल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळच मिळणे त्यांना कठीण झाले आहे. शिवाय शिक्षकांच्या अनेक मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शिक्षकांत रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांचा रोष व्यक्त करून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनात २ ऑक्टोबरला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेकडून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष देवबा शिंदे, सरचिटणीस गजेंद्र उगले, सहसचिव राजेश मोखडकर, कारंजा तालुकाध्यक्ष विनोद कडू, संघटक नागे, उपाध्यक्ष जाधव, एम. के. बोरकर यांच्यासह संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते.
११ शिक्षक संघटनांचा पाठिंबा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी शिक्षक संघ, साने गुरूजी शिक्षक सेवा संघ, आदर्श बहुजन शिक्षक संघ, जुनी पेन्शन हक्क संघटना, परिवर्तन प्राथमिक शिक्षक संघटना, प्रहार दिव्यांग अधिकारी, कर्मचारी संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक संघटना, ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघटना, प्रहार शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त करीत पाठिंबा दर्शविला.