मंगरुळपीर : नुकतेच शैक्षणिक सत्र संपले असुन प्राथमिक व माध्यमीक शाळांचे निकाल सुध्दा लागले आहेत. नवे शैक्षणिक सत्र सुरु होण्याकिरता बराच कालावधी शिल्लक असतांना बहूतांश खाजगी प्राथमिक व माध्यमीक तर काही ठिकाणी उच्च माध्यमीक शाळांमधील शिक्षक रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.आधिच्या शासनाने मागेल त्याला खिरापतीप्रमाणे शाळा वाटल्याने विद्यार्थी संख्येचा प्रश्न बिकट झाला आहे. शाळा जास्त व विद्यार्थी कमी असे उलट चित्र यामुळे निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळेतील आवश्यक विद्याथीृ संख्या टिकविण्याकरिता शिक्षकांना त्यांच्या व्यवस्थापणाने विद्यार्थी संख्येचे लक्ष दिल्याचे समजते. शाळेतील एका तुकडीत नियमाप्रमाणे पटसंख्या नसल्यास ती तुकडी रद्द होवून शिक्षक सुध्दा अतिरिक्त ठरतो. त्यामुळे तुकडी व नोकरी वाचविण्याकरिता शिक्षकांना कसेही करुन आवश्यक विद्यार्थी संख्येचा भरणा करण्याशिवाय पर्यायच उरत नसल्याने अनेक शाळांमधील शिक्षक हे सुट्टया असतांनाही भर उन्हात विद्यार्थी शोध मोहीम राबवितांना दिसत आहेत. यामध्ये अनुदानीत शाळांसह विना अनुदानीत शाळांचाही शिक्षकांचा समावेश असुन अनुदानीत शाळेतील शिक्षक हे नोकरी जावु नये म्हणून तर विना अनुदानीत शाळेतील शिक्षक हे नोकरीसह शाळा अनुदानास पात्र या आशेवर विद्यार्थ्यांच्या शोधात जिवाचे रान करीत आहेत. आधिच खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी स्पर्धा जोरात असतांना जिल्हा परिषदेच्या शाळेला इयत्ता ५ वी व ८ वीचा वर्ग जोडण्यात आल्याचा निर्णय शासनाने घेतल्याने येथील बहूतांश विद्यार्थी हे खाजगी शाळांना मिळणार नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शाळांमधील शिक्षक हे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना गणवेश,पुस्तके, वाहन व्यवस्था अशी आमीषे दाखवुन आमच्याच शाळेत पाल्याचे नाव टाका अशी विनवणी करीत आहेत तसेच विद्यार्थी संख्येचा गंभीर झालेला प्रश्न संस्थाचालकांनी सुध्दा गंभीरतेने घेत आपापल्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या बैठका घेवून अनेक संस्था चालकांनी शिक्षकांना विद्यार्थी संख्येचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे अनेक शिक्षक हे सुट्टीच्या दिवसातही शहरासह ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे चित्र आहे. तर केवळ कागदोपत्री विद्यार्थी संख्येची जुळवाजुळव करुन आपली संस्था चालवावी व अनुदान मिळावे याकरिता शाळा न चालवता शाळेतुन अधिकाधिक गुणवत्तापुर्ण शिक्षण देऊन विद्यार्थी घडविल्यास शाळांना विद्यार्थी शोधण्याची वेळच येणार नसुन विद्यार्थीच शाळेकडे येतील असे मत यानिमित्ताने शिक्षणतज्ञ व्यक्त करीत आहेत.आपल्या शाळेतील तुकडया वाचविण्यासाठी शिक्षकांना मोठा आटापिटा करुन विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांचय पालकांना आमची शाळा किती चांगली पटवून देण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांची भटकंती
By admin | Published: May 12, 2017 5:14 PM