लोकमत न्युज नेटवर्ककाजळेश्वर (वाशिम): कारंजा तालुक्यातील पानगव्हाण येथे गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांचा प्रादूर्भाव वाढला होता. यात काहींना अतिसाराची लागण झाली होती. त्यात दोन बालकांना डेंग्युसदृश आजाराची लागण झाली होती. या संदर्भात लोकमतने ५ फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाºयांसह आरोग्य विभागाच्या पथकाने या गावात दाखल होत घरोघरी भेटी दिल्या, तसेच जलस्त्रोतांची पाहणी केली. यावेळी अतिसाराचा एक रूग्ण, तापाचे सात रुग्ण आढळून आले. कारंजा तालुक्यातील पानगव्हाण येथे विविध आजारांची साथ पसरली असताना आरोग्य विभाग याबाबत अनभिज्ञ होता, तसेच या गावातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या महागाव येथील आयुर्वेदिक दवाखान्यात नियमित वैद्यकीय अधिकारी नसल्याने पानगव्हाण येथील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी कारंजा येथील खासगी दवाखान्यात मोठा खर्च करावा लागत होता. त्यातच गावातील अर्णव विनोद काळे (११) आणि वैदेही ज्ञानेश्वर ताठे (१०) या दोन बालकांना डेंग्युसदृश आजाराची लागण झाल्याने त्यांच्यावर कारंजा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या पालकांकडून मिळाली होती. लोकमतने या संदर्भात ५ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. त्याची घेत तालुका आरोग्य अधिकाºयांनी त्यांच्या सहकाºयांसह पानगव्हाण येथे भेट दिली. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन रुग्णांची पाहणी, तसेच जलस्त्रोतांची पाहणी केली. त्यावेळी गावात तापाची लागण झालेले ७ रुग्ण, तर अतिसाराची लागण झालेला एक रुग्ण आढळला असून, त्याच्यावर अमरावती येथे उपचार सुरू असल्याचे कळले. त्याची प्रकृती बरी असल्याचेही कळले. प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर नांदे, महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागुलकर, सोनोने, खुळे, पद्लमवार आदिंचा पथकात समावेश होता. दरम्यान, आरोग्य विभागाच्यावतीने गावातच उपचार होण्याच्या दृष्टीने आरोग्य पथक कार्यान्वित करण्यात आले असून, रोग प्रतिबंधात्मक उपाय योजनाही राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गावात कोणत्याही व्यक्तीला डेंग्युची लागण झाल्याचे निष्पन्न झाले नसल्याने गावकºयांनी घाबरू नये, असे आवाहन डॉ. शंकर नांदे यांनी केले आहे.
पानगव्हाण येथे आरोग्य विभागाचे पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 4:52 PM