वाशिम : जिल्हयात साथीच्या आजाराने डोके वर तर काढलेच शिवाय अज्ञात आजाराने संपूर्ण जिल्हा फणफणल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच आरोग्य विभागाच्या पथकाने रूग्णांलयांना भेट देवून पाहणी व मार्गदर्शन केले. कारंजा येथे मात्र एकही पथक फिरकले नाही.वाशिम शहरातील काही दवाखान्यांमध्ये रूग्णांसाठी जागाच नसल्याने त्यांना भरती न करताच उपचार करून पाठवून दिल्या जात आहे. मंगरूळपीर येथील ग्रामीण रूग्णालयात अचानक रूग्ण संख्येत वाढ होवून दररोज पाचशेच्यावर तर रिसोड येथे एक हजाराच्यावर रूग्णंवर तपासणी केल्या जात आहे. वाशिम येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात विविध आजाराचे रूग्ण उपचाराकरिता गर्दी करीत असून नोंदणी करीता रांगा लागत आहेत. खासगी दवाखान्यातही मोठया प्रमाणात गर्दी आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर आरोग्य विभाग जागा होवून विविध ठिकाणी पथके पाठवून संपरूण माहिती जाणून घेवून मार्गदर्शन केले.मालेगाव तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अमानी पांगरी नवघरे, पांगरी कुटे, एकांबासह अनेक गावात भेटी देवून ग्रामस्थांना आरोग्य अबाधित रहावे यासाठी मार्गदर्शन केले तसेच केमीफ्रॉस गावात औषध फवारणी करून डासांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. मंगरूळपीर तालुक्यातही हिवताप अधिकारी चव्हाण यांच्या पथकाने भेट देवून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शेलुबाजार येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली तेव्हा रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसून आली. वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयातही रूग्णांची हेळसांड होणार नाही, याकरीता विशेष लक्ष पुरविण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे यांनी संबधितांना कळविले. रिसोड येथे १६ सप्टेंबरपेक्षा जास्त रूग्णांचा समावेश करण्यात आला होता. येथे दुपारपर्यंत कोणतेच पथक दाखल झाले नसले तरी परिसरात काही गावांना भेटी दिल्याचे कळल्याने रिसोड येथेही येवू शकते असे डॉ. जांभरूणकर यांनी सांगितले. मानोरा व कारंजा येथे मात्र संध्याकाळपर्यंत कोणत्याच पथकाने भेट दिली नसल्याचे आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता समोर आले.
प्राथमिक आरोग्य केंद्राला पथकांच्या भेटी
By admin | Published: September 17, 2014 1:21 AM