लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : ऐपतीचा दाखला देण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या रिसोड तहसील कार्यालयातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शासकीय पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली. ही कारवाई गुरूवार, १ जून रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास झाली.याबाबत अधिक माहिती अशी, की रिसोड तहसील कार्यालयात कार्यरत दिलीप उत्तम पवार (वय ४५ वर्षे) या कनिष्ठ लिपिकाविरूद्ध तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३१ मे रोजी तक्रार दाखल केली होती. तहसील कार्यालयात तीन ऐपत दाखले मिळण्याकरिता अर्ज सादर केला असता, लिपिक दिलीप पवार यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून एसीबीच्या पथकाने सापळा रचला असता, लिपिक पवार यांची भेट न झाल्याने परत १ जून रोजी दुपारच्या सुमारास एसीबीच्या पथकाने शासकीय पंचासमक्ष सापळा रचला. यावेळी लिपिक पवारने तक्रारदारास तीन ऐपतीचे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याने पवारला रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर रिसोड पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.
तहसील कार्यालयाचा लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात!
By admin | Published: June 02, 2017 1:31 AM