- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षक, मुख्याध्यापकांनी केलेल्या सर्वेतून जिल्ह्यातील ६५ टक्के पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल नसल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देणार कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या. वार्षिक परीक्षाही घेतली नाही. पहिली ते नववी आणि अकरावीचे निकालही ऑनलाईन पद्धतीने जाहिर करण्यात आलेले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने स्थानिक पातळीवर शिक्षण विभागावर सोपविला आहे. नियोजित वेळेवर शाळा सुरू करणे अशक्य असल्यास ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या आणि किती पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल यासंदर्भात सर्वेक्षण केले असता, ६५ टक्के पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल नसल्याचे समोर आले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७९ शाळा आहेत. वर्ग पहिली ते आठवीची एकूण विद्यार्थी संख्या १ लाख २९ हजाराच्या घरात आहे. यापैकी ६५ टक्के अर्थात ८३ हजार ८०० पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल नाही. उर्वरीत ४५ टक्के पालकांकडे अॅन्ड्राईड मोबाईल आहे. त्यामुळे नियोजित वेळेवर शाळा सुरू न झाल्यास, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याच्या नियोजनातही ‘अॅन्ड्राईड मोबाईल’चा मोठा अडथळा राहणार आहे.
सांगा, ऑनलाईन शिक्षण मिळणार कसे? ६५ टक्के पालकांकडे मोबाईल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:20 AM