संतोष वानखडे/वाशिमजिल्ह्यात अलिकडच्या काळातील धार्मिक स्थळांमधील चोर्यांच्या घटनांनी मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर आणली आहे. अलिकडच्या काळात सहा मंदिरांमधून चार लाख १२ हजार ७८८ रुपयांचे देव-देवतांचे साहित्य चोरीला गेले असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे.जिल्ह्यात नोंदणीकृत ५२२ मंदिरे असून, मंदिरातील जमा होणारी देणगी, दानपेट्या, देवतांचे दागदागिने, सोन्या चांदीच्या वस्तू यावर डोळा ठेवून चोरट्यांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील काही छोट्या-मोठय़ा मंदिरातही डल्ला मारला आहे. त्यातील काही चोर्या उघड झाल्या असल्या तरी पोलिस खाते व धर्मादाय आयुक्त यांच्या सूचनांनंतरही संबंधित मंदिर व्यवस्थापनांनी चोरी होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचेच मंदिरातील चोरी प्रकरणातून अधोरेखित झाले असून, त्यामुळे मंदिरातील ह्यदेवह्णच असुरक्षित झाले असल्याचे दिसून येते. अलिकडच्या काळातील धार्मिक स्थळांमधील चोरीच्या घटना अशा आहेत. अंबेझर पार्श्वनाथ डिगंबर जैन मंदिर नगर परिषद चौक वाशिम येथे १८ मार्च २0१३ रोजी तीन हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी झाली होती. गुरुवार बाजार काटीवेश वाशिम येथील श्री संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिर येथून ४0 हजाराची चोरी, मूर्तीवरील चांदीचे छत्र चोरीला गेले होते. १४ जानेवारी २0१३ रोजी घटना घडली. याप्रकरणी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली नव्हती. आसोला येथील सोमनाथ मंदिरामध्ये ७ मार्च २0१४ रोजी दोन लाख ५0 हजाराच्या साहित्याची चोरी झाली होती. मालेगाव येथील गजानन महाराज मंदिरात १ सप्टेंबर २0१४ रोजी २५ हजार ५00 रुपयांच्या साहित्यावर चोरट्यांनी हात साफ केला होता. मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथील जगदंबा मंदिरातून १२ जानेवारी २0१३ रोजी ८४ हजार २८८ रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. मानोरा तालुक्यातील रामगव्हाण येथील संस्थानमधून २९ जुलै २0१३ रोजी मूर्तीची चोरी झाली होती. जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यामध्ये अनेक जुन्या घडणीच्या मूर्ती आहेत. अशा मूर्तींवरही चोरट्यांचे लक्ष असते. त्यामुळेच भविष्यकाळात मंदिर विश्वस्त संस्था व नोंदणी न झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थापन संस्थांनी मंदिराच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
मंदिरेच बनली असुरक्षित!
By admin | Published: October 31, 2014 1:37 AM