वाशिम: सोनल प्रकल्प ते मोतसावंगा प्रकल्पापर्यंत पाणी आणण्याच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेचे काम मंगरुळपीर पालिकेकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून, यवतमाळ येथील कं पनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहेत. या कामाचे कार्यारंभ आदेशही झाले असून, येत्या दोन दिवसांत या बहुप्रतिक्षीत योजनेच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाºयांनी दिली आहे.
गतवर्षी मंगरुळपीर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ७४ टक्के पाऊस झाला. परिणामी मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्प भरू शकला नाही. ऐन हिवाळ्यातच या प्रकल्पातील जीवंत साठा संपला आणि मृतसाठ्यातून शहराला दोन महिन्यांपासून दर १५ दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आता या प्रकल्पातील मृतसाठाही संपत आल्याने पुढे या प्रकल्पातून पाणी पुरवठा होण्याची शक्यता संपली आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार असल्याने मंगरुळपीर पालिकेच्यावतीने मालेगाव तालुक्यात येणाºया आणि मंगरुळपीर तालुक्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पापर्यंत आणून त्याद्वारे शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना प्रस्तावित केली. तब्बल ४ कोटीहून अधिक खर्च असलेल्या या योजनेला शासनाची सशर्त मंजुरी मिळाली आहे. आता या मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने या योजनेचे काम युद्ध पातळीवर होणे गरजेचे आहे. त्यानुसार या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि यवतमाळ येथील एका नामांकित कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. या योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेशही जारी झाले असून, ९ एप्रिलपासून हे काम सुरू होणार होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते सुरू झाले नाही. आता येत्या दोन दिवसांत या कामाला सुरुवात होऊन महिनाभरात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतरच त्याचा शहराला किती फायदा होतो, ते स्पष्ट होऊ शकणार आहे.