रिसोड: मागील १० दिवसांपासून रिसोड शहरात उन्हाचा पारा चांगलाच चढत आहे. त्यामुळे नागरिक गर्मीने हैराण झाले असून, घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी ते थंडपेयांचा आधार घेत असल्याने थंडपेयांच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
रिसोड शहरात उन्हाची दाहकता वाढल्यामुळे दुपारच्यावेळी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसत आहे. नागरिक उन्हाच्या भितीमुळे सकाळीच आपली कामे आटोपत दुपारी घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. महत्त्वाच्या कामांसाठी ग्रामीण भागातून शहरात येणाºया ग्रामस्थांना मात्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. अशात घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी ते थंडपेयांच्या दुकानांकडे धाव घेत आहेत. त्यामुळेच थंडपेयांच्या दुकानावर दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणारे नागरिक डोक्यात टोपी घालून किंवा डोके आणि चेहरा रुमालाने बांधून उन्हापासून बचाव करीत आहेत. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताची भिती असल्याने डॉक्टर मंडळीकडून नागरिक व लहान मुलांना उन्हापासून बचाव करण्याचा सल्ला देत आहेत.