सध्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. या तुलनेत जिल्हाभरात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १५३ उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना यापूर्वी रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. यासह निती आयोगाकडून मिळालेल्या सात रुग्णवाहिकाही रुग्णसेवेत कार्यान्वित होत्या; मात्र वनोजा, मोहरी, मेडशी, शेलुबाजार यासह इतरही काही प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे असलेल्या रुग्णवाहिका २००४ व २००७ मध्ये मिळालेल्या होत्या. त्या तुलनेने ‘आऊटडेटेड’ झाल्या असून, टायर पंक्चर होणे, टायर फुटणे, वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार बळावले होते. यामुळे ग्रामीण रुग्णांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने १० नव्या रुग्णवाहिका जिल्ह्याला उपलब्ध करून दिल्या असून, त्यातील ६ रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सकांकडे, तर ४ रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या. संबंधितांनी या रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे सुपूर्द केल्या आहेत.
...........................
बॉक्स :
आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा प्रयत्न
जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित आहेत. त्यातील केनवड, किन्हीराजा, शेलूबाजार, आसेगाव, शेंदूरजना या काही केंद्रांमध्ये आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत ‘हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर’ सुरू करण्यात आले आहे, तर २२ केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्राचा दर्जा देण्यात आला आहे. या माध्यमातून आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा प्रयत्न केला जात आहे.
..................
बॉक्स :
गर्भवती महिलांची होणार सोय
ग्रामीण भागातून जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रामुख्याने प्रसूतीत अडचण निर्माण झालेल्या गर्भवती मातांना ‘रेफर’ करण्यात येते. यापूर्वीच्या अधिकांश रुग्णवाहिका जुन्या झाल्याने समस्या उद्भवत होती. आता मात्र नव्या रुग्णवाहिका मिळाल्याने विशेषत: गर्भवती मातांची सोय होणार आहे.