मानोरा (जि. वाशिम): ग्रामपातळीवर विविध शासकीय कामांशी संबंधित महत्त्वाचा दुवा असलेल्या तलाठय़ाची १0 पदे मानोरा तालुक्यात रिक्त असून, या गावाचा प्रभार सोपविण्यात आलेल्या तलाठय़ांवर अतिरिक्त ताण येत असल्यानुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, तसेच शेतकर्यांना त्यांची कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. गावपातळीवरील महत्त्वाचे आणि जबाबदारीचे शासकीय पद म्हणून तलाठय़ाकडे पाहिले जाते. महसूल विभागाशी संबंधित असलेल्या या पदावरील व्यक्तीकडे गाव पातळीवरील अनेक महत्त्वाच्या जबाबदार्या असतात. यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, तसेच सर्वसाधारण जनतेला ओळखपत्र, जातप्रमाण पत्रासह इतर काही महत्त्वाची कागदपत्रे देणे, तसेच गौण खनिज उत्खनन आणि अवैध वृक्षतोडीस आळा घालून शासनाचा महसूल वाचविणे आदि जबाबदार्याही पार पाडाव्या लागतात. मानोरा तालुक्यात मूळ ३८ साजे आहेत. यामध्ये ३८ तलाठी कार्यरत असणे आवश्यक आहे; परंतु तालुक्यात सद्यस्थितीत २८ तलाठीच कार्यरत असून, १0 साजातील तलाठय़ांचे पद रिक्त आहे. त्यातही कार्यरत असलेल्या २८ पैकी तीन तलाठी नवीन असल्यामुळे त्यांचे काम इतर ठिकाणचे तलाठी सांभाळत आहेत.
मानोरा तालुक्यातील १0 गावे तलाठय़ाविना
By admin | Published: October 03, 2015 2:35 AM