लोकमत न्यूज नेटवर्ककरंजी (वाशिम) : येथील करूणेश्वर संस्थानच्या एका हॉलमध्ये ठेवून असलेल्या सुरेश दामोधर कठाळे यांच्या मालकीच्या मंडप साहित्यास अचानक आग लागून १५.७४ लाखांची हानी झाली. ही घटना रविवार, १२ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.यासंदर्भात सुरेश कठाळे यांनी शिरपूर पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की करूणेश्वर संस्थानमध्ये १० मे रोजी आयोजित लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्याच ठिकाणच्या एका हॉलमध्ये सर्व साहित्य ठेवून दिले होते. १२ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्याच मंडपाच्या सर्व साहित्यास आग लागल्याचे वृत्त कळले. त्यावरून घटनास्थळी जावून पाहिले असता, सर्व साहित्य जळून खाक झाले होते. यावेळी गावकºयांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यास यश मिळू शकले नाही. या घटनेत मंडप कपडा, १०० गाद्या, १०० चटई यासह अन्य साहित्य असा एकंदरित १५.७४ लाखांचे नुकसान झाले. याशिवाय आगीच्या घटनेत करूणेश्वर संस्थानच्या हॉलचा स्लॅब जळून ६० हजारांचे नुकसान झाल्याचे सुरेश कठाळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच तलाठी व्ही.एल. अवचार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. पुढील तपास शिरपूर पोलिस करित आहे.
भीषण आगीत १५.७४ लाखांचे मंडप साहित्य जळून खाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 6:14 PM