लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘थॅलेसीमिया’ आजाराबाबत नागरिकांना माहिती व्हावी व योग्य उपाययोजनेतून हा आजार नष्ट व्हावा, या उद्देशाने जागतीक थॅलेसीमिया दिनाचे औचित्य साधून वाशिममध्ये बुधवार, ८ मे रोजी मुख्य मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, ठाणेदार आधारसिंग सोनोने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बालाजी हरण, डॉ. किशोर लोणकर आदी मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका यामार्गे काढण्यात आलेल्या या रॅलीचा जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात समारोप झाला. रुग्णालयातील स्कील लॅब हॉलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलताना प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी सांगितले, की थॅलेसीमिया हा लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबीन या घटकांशी संबंधित आजार असून तो जगभरात आढळून येतो. वाशिम जिल्ह्यातही या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या आजारामध्ये लाल पेशीचे जीवनमान कमी होते. त्यामुळे रुग्णांना दर तीन आठवड्याला रक्ताची गरज भासते. थॅलॅसीमिया या आजाराची लक्षणे वयाच्या तिसºया महिन्यापासून २ वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतात. यामध्ये बाळ सुस्त होणे, वारंवार आजारी पडणे, पाणथडीच्या वाढीमुळे पोट फुगणे, रक्त न दिल्यास चेहºयाचा आकार बदलणे, वाढ खुंटणे, अशी लक्षणे दिसून येतात. थॅलॅसिमियाग्रस्त रुग्णांना वेळेत रक्तदाते उपलब्ध व्हावेत व या आजाराविषयी जनजागृती होवून त्यावरील उपाययोजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. कावरखे यांनी यावेळी केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी उत्कर्ष ब्लड ग्रुपचे पंकज गावंडे, रक्तदान ग्रुपचे पंकज गाडेकर, रमेश चांदवाणी, राजू कोंघे, मोरया ब्लड ग्रुपचे महेश धोंगडे, जीवन अमृत रक्तपेढीचे सचिन दंडे यांच्यासह थॅलेसीमिया जनजागृती समितीने पुढाकार घेतला.
वाशिममध्ये थॅलेसिमीया आजाराची रॅलीव्दारे जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 5:37 PM