लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : घरगुती वादाचा विषय पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यावर या वादातील दुसर्या पक्षातील एका युवकास वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर यांनी भ्रमणध्वनीवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, धमकी दिल्याची तक्रार मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष गजानन भिसडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे १४ ऑगस्ट रोजी केली. यासंदर्भात भिसडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे, की त्यांची मावस बहीण प्रीती हिचे वाशिमच्या काळे फाइल येथील गजानन खंदारे यांच्याशी लग्न झाले असून, ते सध्या परभणी येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. काही घरगुती कारणास्तव प्रीती ही माहेरी राहत आहे. पती-पत्नीमधील वाद सोडविण्याकरिता प्रीतीचे नातेवाईक प्रयत्न करीत आहेत. यासाठी भ्रमणध्वनीवर बोलून तसेच प्रत्यक्ष भेटून आपसात समेट घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यादरम्यान प्रीतीच्या वडिलांनी गजानन खंदारे यांचे वडील उद्धव खंदारे यांना फोन करून झाले गेले ते विसरुन जाऊन प्रीती आणि तिच्या पतीला नव्याने संसार सुरू करण्याची विनंती केली; परंतु उद्धव खंदारे यांनी चुकीची व खोटी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली. या प्रकरणात ठाणेदार पाटकर यांनी प्रीती हिचा भाऊ राहुल जाधव यास भ्रमणध्वनी करून, ईल भाषेत शिवीगाळ केली व पोलीस स्टेशनला ये, तुला पोलिसी हिसका दाखवतो, अशा स्वरूपात राहुलला धमकीदेखील दिली. सदर घरगुती वादाच्या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून न घेता तसेच समेट घडविण्याऐवजी पोलीस निरीक्षक पाटकर यांनी जाधवला भ्रमणध्वनीवर ईल शिवीगाळ केली. तथापि, ठाणेदार पाटकर यांच्यावर त्वरित कारवाई करावी; अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असे भिसडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
राहुल जाधव याच्याविरूद्ध वाशिम शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद आहे. त्यानुषंगाने चौकशी करण्यासाठी जाधव यास वारंवार बोलावूनसुद्धा तो हजर झाला नाही. त्यामुळेच आपण त्यास फोन करून हजर राहण्यास सांगितले; परंतु तो एकेरी संवाद साधायला लागल्यानेच त्यास केवळ ‘बायल्या’ म्हणून संबोधले. - विजय पाटकरठाणेदार, शहर पोलीस स्टेशन