वनाेजा : मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम वनोजा ते पिंजर डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम कंत्राटदाराने थातुरमातुर केल्याने पुलाला अल्पावधीतच भगदाड पडले आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर २९ ऑगस्ट २०२० राेजी झाली. मात्र, ठेकेदाराने मे २०२१ राेजी तब्बल नऊ महिन्यांनंतर कामाला सुरुवात केली. ९ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या अंदाज पत्रकानुसार २९ लक्ष रुपयांचे हे काम हाेते. परंतु निविदेप्रमाणे ते झाले नसून निकृष्ट झाले आहे. काही काम अर्धवट आहे. तरी संबंधित बांधकाम विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून संबंधित ठेकेदारास कामाच्या गुणवत्तेबाबत व ते वेळेवर पूर्ण करण्याची ताकीद द्यावी. अन्यथा त्यांचे कामाचे पैसे काम चांगल्या दर्जाचे झाल्यशिवाय देऊ नयेत अशी वनोजा व परिसरातील नागरिकांची मागणी आहे. या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर गावापर्यंत तीन पूल असून दुरुस्ती प्रतीक्षेत आहेत. एक मोरी पूल, पाच मोरी पूल तसेच लेंडी नाल्यावरील पूल या पुलाच्या दुरुस्तीकरिता अनेक वर्षांपासून नागरिकांमधून मागणी प्रलंबित आहे. पावसाळ्यात थोडेजरी पाणी जास्त झाले की नाल्याच्या पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे वनोजा ते पिंजरकडे जाणारी वाहतूक प्रभावित होते. या रस्त्यावर अर्धवट दुरुस्त केलेल्या खड्ड्यांमुळे आजही वाहन चालकांची कसरत सुरू असून, पायी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
--------
संबंधित ठेकेदाराला कामाच्या दुरुस्ती साठी अनेक वेळा फोन केला मात्र ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही. मी पुलाची पाहणी केली आहे, लवकरच दुरुस्ती होईल.
मोहनिश जोजारे
कनिष्ठ अभियंता
सा.बां.विभाग मंगरुळपिर