वाशिम : जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २ लाख २७२ शेतकऱ्यांच्या १ लाख ६४ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी आवश्यक असलेल्या २२३ कोटी ७५ लाखांच्या अनुदानापैकी १९७ कोटी २३ लाख ८४ हजार २२४ रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले; मात्र हा मदतनिधी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याच्या कामावर क्षेत्रीय संघटनांनी बहिष्कार टाकला. त्यांच्या या आडमुठ्या धोरणापुढे प्रशासनही हतबल झाले असून ऐन दिवाळीत शेतकरी आत्महत्या वाढण्यास ही बाब कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात जुलै २०२२ मध्ये मालेगाव, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यातील १२९७ हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. ऑगस्ट महिन्यात सहाही तालुके बाधित होत तब्बल १ लाख ४३ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले; तर सप्टेंबर महिन्यात मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यांमधील १९ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांचे जबर नुकसान झाले.
यादरम्यान महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा सर्वे व पंचनामे केल्यानंतर १ लाख ६४ हजार ११४ बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी २२३ कोटी ७५ लाखांचा निधी आवश्यक असल्याचा अहवाल शासनाकडून पाठविण्यात आला. शासनस्तरावरूनही वेळीच दखल घेत १९७ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला पाठविण्यात आला. मात्र, हा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याच्या कामावर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांच्या क्षेत्रीय संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शासनाकडून पैसा येऊनही तो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणे अशक्य झाले आहे.