वाशिम : जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मालेगाव व मंगरूळपीर अशा चार बाजार समित्यांच्या प्रत्येकी १८ संचालक पदासाठी ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला असून, दुपारी १२ वाजेपर्यंत सरासरी ५९ टक्के मतदान झाले.पहिल्या टप्प्यात वाशिम व मानोरा बाजार समितीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान झाले होते. २९ एप्रिल रोजी या दोन्ही बाजार समितीचा निकाल जाहिर झाला.
३० एप्रिल रोजी कारंजा, रिसोड, मालेगाव व मंगरूळपीर अशा चार बाजार समितीसाठी मतदानाला सुरूवात झाली. रिसोड बाजार समितीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघात ९२८ मतदार आहेत. याप्रमाणेच ग्रामपंचायत मतदारसंघात ७५३, आडते व व्यापारी मतदारसंघात २७४ तर हमाल व मापारी मतदारसंघात ५१८ मतदार आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत २४७३ मतदारांपैकी १६५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, याची टक्केवारी ६६.८० अशी येते.
मालेगाव बाजार समितीत २२८० मतदार असून, आतापर्यंत सरासरी ५७ टक्के मतदान झाले. कारंजा व मंगरूळपीर बाजार समितीतही अनुक्रमे ५६ व ५८ टक्के मतदान झाले. चार बाजार समिती मिळून सरासरी ५९ टक्के मतदान झाले असून, ढगाळ वातावरण असल्याने दुपारपर्यंत अधिकाधिक मतदान करण्यावर भर दिला जात असल्याचे मतदानाच्या आकड्यावरून दिसून येते.
आधी मतदान; मग कर्तव्य
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख, भाजपा, शिवसेना (शिंदे) प्रणीत पॅनल आणि आमदार अमित झनक, मित्रपक्ष व महाविकास आघाडी प्रणीत पॅनल अशा दोन पॅनलमध्ये तगडी लढत होत आहे. एका मताने सीटला धक्का पोहोचू नये नये म्हणून अधिकाधिक मतदार हे मतदान केंद्रात मतदानासाठी येत आहेत. रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल येथील सरपंच राहुल डोंगरे यांचे रविवारी (दि.३०) लग्न असून, बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.