वाशिम जिल्हयातील कारंजा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी शुक्रवार २३ फेब्रुवारी राेजी सकाळी मुंबई येथील रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून पाटणी हे आजारी हाते. राजेंद्र पाटणी यांच्या निधनाने वाशिम जिल्हयावर शाेककळा पसरली. अनेक मान्यवरांनी शाेकसंवेदना व्यकत केली.
राजेंद्र पाटणी कारंजा-मानाेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हाेते, राजेंद्र पाटणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळख हाेती. पाटणी यांनी पूर्वी शिवसेनेकडून विधानपरिषद आणि विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच १९९७ ते २००३ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व सुध्दा केले. २००४ शिवसेनेच्या तिकिटावर कारंजातून राजेंद्र पाटणी विजयी झाले हाेते. २००९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही ते खचून न जाता २०१४ मध्ये भाजपात प्रवेश करुन २०१४ व २०१९ मध्ये भाजपाकडून कारंजा विधानसभेतून विजयी झाले. पाटणी यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही यशस्वी कार्य केले. पाटणी अभ्यासू, अत्यंत मृदू स्वभावी व जिल्हयाच्या विकासात महत्वाचे याेगदान असलेले नेते म्हणून परिचित हाेते. मात्र राजेंद्र पाटणी यांच्या निधनाने कारंजा विधानसभा मतदारसंघ पाेरका झााला असून जिल्हयाचीही हानी झाली आहे.
जिल्हा विकासासाठीही पुढाकार
कारंजा-मानाेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले राजेंद्र पाटणी यांनी वाशिम जिल्हा विकासासाठीही माेलाचे याेगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वाशिम नगरपरिषदेवरही आपली पकड मजबूज केली हाेती. जिल्हयासाठी विविध याेजना, विकासासाठी ते नेहमी तत्पर असायचे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला हाेता.