नंदकिशोर नारे, वाशिम: पुरुषांच्या तुलनेत कोणतेही काम करायला आता महिला सुद्धा मागे नाहीत. अनेक युवती, महिला विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. त्यात शेतीत राबणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. मानोरा तालुक्यातील बेलोरा येथील महिला शेतकरी निता मुंगशीराम उपाध्ये यांनी आपल्या पतीच्या साथीने आपल्या शेतात मेहनत करून त्यांनी बेलोरा गावी शेतीला जोडधंदा म्हणून दालमील हा उद्योग सुरू केला आहे.
सिमा उपाध्ये यांचे पती मुंगशीराम उपाध्ये हे प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे शेती कमी असल्याने फारसे उत्पादन होत नाही, कुटुंब चालविणे, मुलांचे शिक्षण, सासू सासरे यांचे दुखणे-खुपने, यासाठी पैसा कमी पडायचा. त्यामुळे त्यांचे पती मुंगशीराम उपाध्ये यांनी कृषी विभागाच्या मदतीने दालमीलसाठी प्रयत्न केले आणि त्यात यश मिळाले आणि शेतीला जोडधंदा म्हणून उत्पन्न वाढीची नवीन वाट शोधली आहे. आता या लघू व्यवसायातून बऱ्यापैकी मिळकत होते. त्याच बरोबर गहू साफ करण्याची मशीन सुद्धा आहे. त्यामुळे या व्यवसायाचा आम्हाला मोठा आधार झाल्याचे सिमा उपाध्ये यांनी सांगितले.
महिलांसह इतरांसाठी हे एक आदर्श उदाहरण आहे. अनियमित पाऊस, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ आणि शेतमालाचे भाव कमी असणे. यामुळे शेती आता न परवडणारी झाल्याने अनेकांनी शेती सोडली. परंतु शेतीसोबत जोडधंदे निवडले, तर बेरोजगारी निर्माण होणार नाही. असे मत निता उपाध्ये यांनी व्यक्त केले. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक उद्योग आहे सर्वांनी नवनवीन प्रयोग करून शेतीला जोडधंदा सुरू केला पाहिजे. जिद, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर एक महिला काय करू शकते, शिवाय शेतीला जोडधंदा कसा करावा, हे निता उपाध्ये यांनी दाखवून दिले.