वाशिम : आई वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा नसेल तर रूढी परंपरेने मुलींना तो अधिकार दिलेला नाही. मात्र, हिंमतीने रूढींचे जू दूर करीत तो अधिकार मिळवता येत असल्याचे एक उदाहरण वाशिम येथील भगिनींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा व अग्नी देऊन दाखवून दिले आहे. वाशिम येथील अकोला रस्त्यावर असलेल्या दत्त नगरमधील रहिवासी तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी जिजेबा किसन पट्टेबहादूर (७१) यांचे २० सप्टेंबर राेजी रात्री उशिरा निधन झाले. त्यांना मुलगा नसून पाचही मुलीच आहेत.
मुलगा नसल्याने मृत्यूनंतर मुलींनी २१ सप्टेंबर रोजी साश्रृनयंनांनी वडिलास खांदा देऊन त्यांच्या पार्थिवाला अग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला . त्यांच्या या कृतीचे उपस्थितांकडून कौतुक होत असतानाच अकाली गेलेल्या वडिलांच्या सेवेतील मुलींना बघून हळहळही व्यक्त केली जात होती. यावेळी जिजेबा यांच्या मुली उज्वला, रुपाली, पूजा, दिपाली, खुशी यांनी एकच आक्रोश केलेला दिसून आला. जिजेबा यांच्या मुली खासगी नोकरी तर काही जण शिक्षण घेत आहेत.
दत्तनगर परिसरातील पट्टेबहादूर हे ए नामांकित व मनमिळावू कुटुंब आहे. मृत्यूनंतर होणारे सोपस्कार हा मुलगाच करु शकतो. ही खंत मनात न ठेवता पाचही मुलींनी जिजेबा यांना खांदा दिला व स्मशानभूमित रितीरिवाजानुसार सोपस्कार पूर्ण करीत पित्याला भडाग्नी देऊन मुलाची कमतरता या मुलींनी शेवटच्या क्षणालाही भासू दिली नाही. स्मशानभूमित शेकडो नातेवाईकांनी हा प्रसंग आपल्या डोळ्यांनी बघितला. जिजेबा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांबाबत अनेकांमध्ये हळहळ व्यक्त केली .
अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या जावयासह एकावर घालाआपल्या सासरेबुवांचे निधन झाल्याची वार्ता कळताच अंत्यसंस्कारासाठी रात्री उशिरा मोटारसायकलने पुणे येथून निघालेल्या जावयाचा व त्यांच्यासोबत असलेल्या त्यांचे जावई यांचा मृत्यू अपघातात झाल्याची घटना संभाजीनगर नजिक २१ सप्टेंबर रोजी घडली. जिजेबा पट्टेबहादूर यांची दिपाली नामक मुलगी पुणे येथे वास्तव्यास आहे. मुलगी आाधीच वाशिम येथे आलेली होती. सासरेबुवा यांचे निधन झाल्याचे जावई विजय उत्तम इंगोले यांना कळाल्यावर ते व सोबत त्यांचे जावई सतिष रसाळ मोटारसायकलने वाशिम करता निघाले. रस्त्यात संभाजीनगरजवळ त्यांचा अपघात होऊन यात दोघांचा मृत्यू झाला. याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.