वाशिम : पोलिसांत रिपोर्ट द्यायला सोबत का गेला म्हणून आरोपीने देपुळ येथील माजी उपसरपंचांचा डोक्यात विटीने घाव घालून खून केला. ही थरारक घटना २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता वाशिम तालुक्यातील देपूळ येथे घडली. संजय दूर्योधन गंगावणे (वय ५५ वर्षे), असे मृतक माजी उपसरपंचाचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाचा मुलगा आतिश गंगावणेच्या फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांनी आरोपी रामदास भाऊराव गंगावणे रा. देपूळ, ता. वाशिम याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली.मृतक संजय गंगावणे यांचा मुलगा आतिश गंगावणे (वय ३३ वर्षे) रा. देपूळ, ता. वाशिम याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीचा आशय असा की, १९ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपी रामदास गंगावणेने त्याचा ओटा फिर्यादीच्या काकाच्या ट्रॅक्टरने खचल्याचा खोटा रिपोर्ट दिला होता. त्यानंतर फिर्यादीचे चुलत काका महादेव लक्ष्मन गंगावणे यांनीही रामदास गंगावणेच्या विरोधात पोलिसांत रिपोर्ट दिला होता. तेव्हा त्यांच्यासोबत फिर्यादीचे वडील संजय गंगावणे गेले होते. त्यावरून रामदास गंगावणे याने रिपोर्ट देण्याकरीता सोबत का गेला म्हणून फिर्यादीचे वडील संजय गंगावणे यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. ही बाब त्यांनी फिर्यादीला सांगितली होती.
अशातच २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी घरी असताना त्याचे वडील संजय गंगावणे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास फिर्यादी गावातील बसथांब्याजवळ मोबाईल पाहत असताना त्याला जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने फिर्यादी गेला असता आरोपी रामदास गंगावणे हा फिर्यादीच्या वडिलांना डोक्यात विटीने मारत असल्याचे दिसले. त्यावेळी आरोपी रामदास गंगावणेचा पिता भाऊराव गंगावणेसुद्धा तेथे होता. फिर्यादीला पाहताच आरोपी रामदास गंगावणे तेथून निघून गेला, तर फिर्यादी पोहोचल्यानंतर भाऊराव गंगावणेही तेथून निघून गेला.
संजय गंगावणे गंभीर जखमी झाल्याने फिर्यादीने गावातील अरूण गंगावणे यांच्या वाहनाने त्यांना वाशिम येथील रुग्णालयात आणले. तेथून त्यांना अकोला येथे रुग्णवाहिकेने नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती फिर्यादीच्या भावाने दिली. त्यामुळे आरोपी रामदास गंगावणे यानेच जुन्या कारणावरून वडिलांचा खून केल्याचे फिर्यादीने फिर्यादीत नमूद केले. यावरून पोलिसांनी आरोपी रामदास गंगावणेविरोधात कलम ३०२ व ५०६ नुसार दाखल करून त्यास अटक केली; परंतु वृत्तलिहिस्तोवर आरोपीच्या पित्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती.