संतोष वानखडे, वाशिम: जुगाराच्या गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी परत करण्यासाठी तक्रारदाराकडून १३०० रुपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ जुलै रोजी जऊळका रेल्वे स्टेशनच्या पोलिस हेड काॅनस्टेबलला जऊळका येथे रंगेहात पकडले. शफिक अहेमद रफीक अहेमद खान असे आरोपीचे नाव आहे.किन्हीराजा (ता.मालेगाव) येथील एका ३० वर्षीय तक्रारदारावर ३ जुलै रोजी जऊळका रेल्वे पोलिस स्टेशन येथे जुगाराचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात एक दुचाकी जप्त करण्यात आली होती.
जप्त केलेली दुचाकी परत करण्यासाठी पोलिस हेड काॅनस्टेबल शफिक अहेमद रफीक अहेमद खान याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतू, तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ५ जुलै रोजी जऊळका रेल्वे येथे प्रत्यक्ष पडताळणी केली असता, आरोपीने तडजोडीअंती १३०० रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. यावरून जऊळका येथील शिवाजी हायस्कूलजवळ सापळा रचला असता आरोपीने तक्रारदाराकडून १३०० रुपयाची लाच स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने आरोपीला ताब्यात घेतले असून, जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारूती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक सुजित कांबळे, कर्मचारी राहुल व्यवहारे, योगेश खोटे, रवी घरत यांनी केली.