वाशिम : जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाकडे स्वत:चे वाहन नाही. ९ वाहने मिळणार असून, त्यापैकी मंगळवारी (दि.२०) एक वाहन देण्यात आले तर ८ वाहने प्रतिक्षेत आहेत.
लम्पी हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सहाही तालुक्यात लम्पीचा शिरकाव झाला असून, लम्पीला वेळीच रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे स्वत:चे एकही वाहन नाही. बाधित क्षेत्रात पाहणी करण्यासाठी वाहनाअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाला वाहनांची आवश्यकता असून, तात्पुरत्या स्वरूपात ९ वाहने मंजूर झाली आहेत. मंगळवारी एक वाहन मिळाले असून, नादुरूस्त व अन्य कारणांमुळे ८ वाहने प्रतीक्षेत आहेत.
तालुकास्तरीय यंत्रणेकडेही स्वत:चे वाहन नसल्याने बाधित क्षेत्रात लसीकरण कसे करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अडथळ्यांची शर्यत पार करीत लसीकरणाचे उद्दिष्ट गाठताना पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येते.