- शिखरचंद बागरेचा
वाशिम : मागील ४२ वर्षांपासून न्यायालयीन आदेशावरून बंद असलेले जिल्ह्यातील शिरपूर जैन स्थित सुप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मूर्तीच्या लेप प्रक्रियेस अखेर गुरुवार २३ मार्च रोजी सुरवात झाली.
शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर उघडून लेप प्रक्रिया करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आदेश दिले होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीनंतर पंन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराज व ऐल्लकश्री सिद्धांतसागरजी महाराज यांनी २३ मार्च रोजी लेप प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संयुक्तरित्या जाहीर केले होते. त्यानुसार श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मूर्तीच्या लेप प्रक्रियेला गुरुवारी सकाळी १० वाजता पंन्यास प्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज यांनी मंत्रोच्चाराने विधिवत सुरुवात झाली. यावेळी योगसागरजी महाराज,
सिद्धांतसागरजी महाराज, श्रमणहंस विजयजी महाराज तसेच अन्य मुनिश्रीसह मॅनेजिंग ट्रस्टी दिलीप शाह, डॉ.संतोष संचेती आदी उपस्थित होते. सकल जैन समाजात याबद्दल आनंद व्यक्त होत आहे. जैन समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या शिरपूर जैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती असून, ही मूर्ती जमिनीपासून अधांतरी असल्यामुळे विश्वप्रसिद्ध आहे. मूर्तीची लेप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर सकल जैन समाजबांधवाना पूजन व दर्शनाचा लाभ मिळणार आहे. तहसीलदार रवी काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, ठाणेदार सुनील वानखडे, पोलिस निरीक्षक सुधाकर आढे,सहायक पोलिस निरीक्षक जगदीश बांगर यांच्या मार्गदर्शनात सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे.
श्रीं च्या मूर्तीचे दर्शन सुरू
श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मूर्तीची लेप प्रक्रिया सुरू झाली असून भाविकांसाठी भगवंताच्या मूर्तीचे दर्शन सुरू ठेवलेले आहे.