वाशिम : सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात ‘गालगुंड’ (गालफुगी) आजारास प्रतिबंध करणारी लस देण्यासंबंधी शासनाने अद्याप लक्ष पुरविले नाही. यामुळे दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान उद्भवणाऱ्या या आजाराने ५ ते १५ वर्षे वयोगटातील लाखो मुले पछाडले जात आहेत. असे असताना २०२३ मध्ये महाराष्ट्रात गालफुगीचे केवळ २६ रुग्ण निष्पन्न झाल्याची नोंद ‘आयडीएसपी-आयएचआयपी पोर्टल’वर घेण्यात आली आहे.
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत मूल जन्माला आल्यापासून ते १६ वर्षाचे होईपर्यंत विविध प्रकारच्या १२ प्रतिबंधात्मक लसी दिल्या जातात. त्यात घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, गोवर, रूबेला, क्षयरोग, काविळ, मेंदूज्वर, अतिसार आणि श्वसनदाहचा समावेश आहे. मात्र, ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना सर्रास जडणाऱ्या ‘गालगुंड’ या आजारापासून प्रतिबंधात्मक लसीचा त्यात अद्याप समावेश करण्यात आलेला नाही.
गंभीर बाब म्हणजे दरवर्षी लाखो मुले ‘गालगुंड’ने बाधित होत असताना त्याचे ‘रेकाॅर्ड’ही ठेवले जात नाही. त्यामुळेच २०२३ मध्ये ‘गालगुंड’ने बाधित केवळ २६ रुग्ण निष्पन्न झाल्याची नोंद ‘पोर्टल’वर घेण्यात आल्याचे दिसत आहे.‘आरटीआय’मध्ये शासन उदासिनता झाली उघडवाशिम येथील बालरोगतज्ज्ञ डाॅ. हरीश बाहेती यांनी दिल्लीस्थित ‘नॅशनल सेंटर फाॅर डिसीज कंट्रोल’ विभागाकडे ‘आरटीआय’ अर्ज करून महाराष्ट्रात २०२३ मध्ये ‘गालगुंड’ने बाधित रुग्ण किती? एमआर, एमएमआर लस किती मुलांना दिली? २०२२-२३ मध्ये ‘गालगुंड’ने किती मृत्यू झाले? आदिंबाबत माहित मागविली होती. मात्र, वर्षभरात केवळ २६ रुग्ण निष्पन्न झाल्याव्यतिरिक्त अन्य माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.पुण्यात केवळ ४ रुग्ण; अन्य जिल्हे शून्यावर कसे?‘एनसीडीसी’च्या अहवालात २०२३ मध्ये ‘गालगुंड’ने बाधित रुग्णांसंबंधी जिल्ह्याच्या रकान्यात २२ आणि पुणे जिल्ह्यात ४ असे केवळ २६ चा आकडा दर्शविण्यात आला आहे. राज्यातील अन्य सर्व जिल्ह्यांपुढे मात्र ‘शून्य’ नमूद करण्यात आला. ही बाब भुवया उंचावणारी ठरली असून शासकीय उदासिनता त्यातून अधोरेखीत होत आहे.‘शासकीय’मधून ‘गालगुंड’ला प्रतिबंधात्मक लस दिली जात नाही. त्यामुळे वाशिमसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दरवर्षी ५ ते १५ वर्षे वयोगटातील लाखो रुग्ण त्रस्त असतात. मात्र, ‘आरटीआय’अंतर्गत मागविलेल्या माहितीमध्ये पुणे वगळता अन्य सर्व जिल्ह्यांत २०२३ मध्ये ‘गालगुंड’बाधित रुग्णसंख्या शून्य दर्शविण्यात आली आहे.डाॅ. हरीश बाहेती, बालरोगतज्ज्ञ, वाशिम