वाशिम : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व बोगस लाभार्थींना आर्थिक लाभ देऊन शासन निधीमध्ये अफरातफर करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून मानोरा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या नागरिकांना रविवारी (दि. २६) सायंकाळी ५ वाजेपर्यंतही ठोस आश्वासन मिळाले नाही.
मानोरा तालुक्यातील भुली येथिल अतिवृष्टीमुळे घराची पडझड व अन्नधान्याचे नुकसान झाल्याने भरपाई मिळणे अपेक्षित आहे. अनेकांना अद्याप लाभ मिळाला नाही तर दुसरीकडे गावातील काही पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमाला बगल देऊन बोगस लाभार्थींना आर्थिक लाभ देऊन शासनाच्या निधीमध्ये अफरातफर केल्याचा आरोपही उपेाषणकर्त्यांनी केला. याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २० नोव्हेंबरपासून मानोरा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. अद्यापही याची दखल घेण्यात आली नाही. देवानंद शिंदे, जीवन पुरी, मंगल दुबे, गणेश पिंगाने, पुंडलिक पिंगाणे, प्रवीण वारे, आप्पाराव भगत आदी उपोषणास बसले आहे. रविवारी उपोषणास सेवानिवृत्त वन अधिकारी सिद्धार्थ देवरे, शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी भेट देऊन समर्थन दिले.