नंदकिशोर नारे, वाशिम : बिथरलेल्या वळूने गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन बैलांवर हल्ला चढवून त्यांना जिवे मारल्याची थरारक घटना बुधवार २१ फेब्रुवारीला रात्री वाशिम तालुक्यातील देपूळ येथे घडली. यावेळी संबंधित शेतकरी विजय शिंदे यांचे वडील गोविंदा शिंदे, त्याच गोठ्यात झोपलेले होते. त्यांनी पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेत विजय शिंदे यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
देपूळ येथील एका व्यक्तीने बजरंगबलीच्या नावे एक वळू वाहिला आहे. या वळूचे शंकर असे नामकरण करण्यात आले आहे. शंकर नावाचा हा वळू आता बिथरला असून, तो माणसांवर हल्ला करीत त्यांना जखमी करण्याच्या घटना घडत आहेत. गावात आलेल्या पाहुण्या मंडळीवर ही या वळूने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. यातून एखादी अप्रिय घटना घडण्याची भीती असल्याने या वळूचा बंदाेबस्त करण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. अद्याप, असा उपाय करण्यात आला नाही. त्यामुळे या वळूकडून होणाऱ्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच बिथरलेल्या या वळूने बुधवारी रात्री कहरच केला. विजय शिंदे यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन बैलांवर या वळूने हल्ला केला. त्यात दोन्ही बैल ठार झाले. याच वेळी विजय शिंदे यांचे वडील गोविंदा शिंदे ही तेथेच झोपले होते. बिथरलेल्या वळूचा बैलांवरील जीवघेणा हल्ला पाहताच त्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.