वाशिम : कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयात ११ वी सायन्स आणि काॅर्मसच्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यादरम्यान एका विद्यार्थ्याने समोरच्या गटातील तीन विद्यार्थ्यांवर अचानक चाकू हल्ला करून जखमी केले. ७ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, बिलाल याकूब कालूत (१७), नूर अकील पठाण (१७) आणि रेहान रहीम खान हे तीन विद्यार्थी काॅलेजमध्ये असताना निखील अंबादास मेहरे (१२वी सायन्स, रा.शिवाजी नगर) याने किरकोळ वाद घालत नमूद तिन्ही विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला चढविला. यात बिलाल याकूब कालूत याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली; तर अन्य दोघेही जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आधारसिंह सोनोने तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांवर कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. दरम्यान, या खळबळजनक घटनेला विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासनच जबाबदार असल्याचे मत जखमी विद्यार्थ्यांचे पालक याकूब कालूत यांनी व्यक्त केले. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार आधारसिंह सोनोने यांनी दिली.पोलिसांकडून आरोपीस अटक -याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी निखील मेहरे (१९) याच्यावर भादंविचे कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
विद्यार्थ्यानेच केला विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, विद्याभारती महाविद्यालयात थरार; अन्य विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण
By सुनील काकडे | Published: January 07, 2023 6:52 PM