वाशिम : एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच तापत आहे. यामुळे बाईक (इलेक्ट्रिक वाहन) पेटण्याचा धोका वाढत आहे. सोमवारी (दि.२९) दुपारी २ वाजताच्या सुमारास वाशिम शहरात एका स्कूटीने पेट घेतल्याची घटना घडली.
उन्हाळ्यात ई-बाईकने पेट घेतल्याच्या घटना गेल्यावर्षी घडल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक वाहनांची बॅटरी क्षमता २५० वॅट पेक्षा जास्त नसावी तसेच वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा अधिक नसावी, ही अट घालून देण्यात आली आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणीही केली जात आहे. ई-वाहनांची बॅटरी, वायरिंग यासंदर्भात गेल्यावर्षी तक्रारींचे प्रमाणही वाढले होते. उन्हाच्या प्रखरतेमुळे ई-बाईक पेट घेण्याची सर्वाधिक शक्यता असताना, सोमवारी वाशिम शहरात पेट्रोलवरील स्कूटीने पेट घेतला. यावरून उन्हाचा पारा चांगलाच तापत असल्याचे समोर आले. उन्हाळ्यात दुचाकी, स्कूटीने पेट घेण्याच्या घटना टाळण्यासाठी वाहने शक्यतोवर सावलीत ठेवणे आवश्यक ठरत आहे.
वाहनाने पेट घेऊ नये म्हणून काळजी काय?
- भरउन्हात वाहन उभे करू नये.- वाहनाची टाकी इंधनाने पूर्ण भरू नये.- वाहनाची वायरिंग तपासून पाहावी.- वाहन झाडाच्या, भिंतीच्या सावलीत उभे करावे.