लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पिकांसाठी आवश्यक असलेले डीएपी (डायमोनियम फॉस्फेट) खत शेतकऱ्यांना जुन्याच किमतीत मिळावे, त्यांच्यावर वाढीव किमतीचा भर पडू नये, यासाठी केंद्र सरकारने खतांवरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय बुधवार, १९ मे रोजी जाहीर केला. मात्र, या संदर्भातील सूचना अद्याप प्राप्त न झाल्याने २० मे रोजी नवीन किमतीनुसारच शेतकऱ्यांना खताची खरेदी करावी लागल्याचे दिसून आले. या किमतीसंदर्भात काही ठिकाणी शेतकरी आणि कृषी सेवा केंद्रांच्या संचालकांमध्ये शाब्दीक वादही झाले.
सततची नापिकी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन घेण्यात अडचणी येतात. त्यातच शेतमालाच्या हमीभावाच्या तुलनेत रासायनिक खते, बियाण्यांच्या किमतीत प्रचंड वाढ होत आहे. एकिकडे लागवड खर्च वाढत आहे तर दुसरीकडे फारसे उत्पन्न हाती येत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच यंदा रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने सर्वच स्तरातून या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खताच्या किमती कमी करण्याची मागणी झाल्याने शेवटी डीएपी खतावरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने १९ मे रोजी जाहीर केला. डीएपी खताच्या प्रतिपिशवीच्या खरेदीवर मिळणारे ५०० रुपयांचे अनुदान वाढवून १,२०० रुपये करण्यात आल्याने शेतकऱ्यांना जुन्याच किमतीत खते उपलब्ध होणार आहेत. या संदर्भात २० मे रोजी जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांमध्ये पडताळणी केली असता, अनुदानात वाढ केल्यासंदर्भात कोणत्याही सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेल्या नाहीत. सूचना प्राप्त होईपर्यंत वाढीव किमतीनुसारच शेतकऱ्यांना खत घ्यावे लागणार आहे, असे विक्रेत्यांनी स्पष्ट केले. रिसोड, मालेगाव, वाशिम, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथे खते खरेदी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव अनुदानासंदर्भात माहिती देऊन जुन्या दराने खते देण्याचा आग्रह केला असता, याबाबत कोणत्याही सूचना नसल्याने नवीन किमतीनुसार खते घ्या, असे विक्रेत्यांनी सांगितले. जुन्या आणि नवीन किमतीवरून काही ठिकाणी शेतकरी व विक्रेत्यांमध्ये शाब्दीक वादही झाले.
०००००००००
बॉक्स
वेगवेगळ्या ठिकाणी किमतीही वेगळ्या !
दोन कंपनीच्या डीएपी खताच्या किमतीमध्ये जिल्ह्यातील सहा प्रमुख शहरांमध्ये समानता नसल्याचा प्रकारही समोर आला. एका कंपनीच्या डीएपी खताच्या बॅगची किंमत १,९०० आणि दुसऱ्या कंपनीच्या खताची किंमत १,२०० अशी निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र, यामध्ये शहर बदलले की किंमतही बदलत असल्याचे दिसून येते. कारंजा शहरातील दोन कृषी सेवा केंद्रांत खताचे दर १,९०० आणि १,२०० रुपये असल्याचे आढळून आले. मालेगाव येथे १,९०० रुपये, मानोरा येथे १,५०० रुपये, रिसोड येथे १,९०० आणि १,५०० रुपये, वाशिम येथे १,९०० आणि १,२०० असे दर असल्याचे समोर आले. त्यामुळे डीएपी खताचे दर नेमके कोणते? याबाबत दर्शनी भागात दरपत्रक लावण्याचे निर्देश कृषी विभागाने द्यावेत, सर्वच ठिकाणी किमती समान असाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
००००००००
कोट
कालच केंद्र सरकारने खतावरील अनुदानात वाढ केली. परंतु, दुपारपर्यंत कंपनीकडून भाव कमी करण्याच्या सूचना आलेल्या नाहीत. आम्ही जादा दराने खताची खरेदी केली, वरिष्ठ स्तरावरून सूचना प्राप्त झाल्या की, त्यानुसार खताची विक्री केली जाईल. आम्ही विक्रेते असलो तरी शेतकरी आहोत. शेतकरी हिताचा निर्णय स्वागतार्ह आहे.
- यशवंत देशमुख
अध्यक्ष, कृषी व्यावसायिक संघटना, मानोरा