वाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तिसरी लाट आली तर उपचारार्थ शहरी भागातच यावे लागणार आहे. दुसरीकडे शहरी भागात आठ बालरोगतज्ज्ञ उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिकच प्रभावित झाले होते. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात १५ वर्षांआतील १७८७ मुलांना कोरोना संसर्ग झाला होता. जून महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने घट येत आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून संपलेला नाही. तिसऱ्या लाटेची तसेच या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञांची ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आली. वाशिम व कारंजा येथील सरकारी रुग्णालयांत बालकांसाठी सुसज्ज बेडचीही व्यवस्था करण्यात आली. दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र बालरोग तज्ज्ञ नसल्याने कार्यरत डॉक्टरांनाच प्रशिक्षण व आवश्यक ती माहिती देऊन तज्ज्ञ केले जात आहे. जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १५३ उपकेंद्रे आहेत. एकाही आरोग्य केंद्रात बालरोगतज्ज्ञ नाही. त्यामुळे भविष्यात तिसरी लाट आलीच तर ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारार्थ शहरी भागात येण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. ग्रामीण भागातही कंत्राटी स्वरूपात बालरोगतज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करावी, असा सूर ग्रामीण जनतेतून उमटत आहे.
०००००००००००
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर एक नजर
प्राथमिक आरोग्य केंद्रे २५
आरोग्य उपकेंद्रे १५३
एमबीबीएस डॉक्टर ३६
बीएएमएस डॉक्टर १३
०००००००००००
शहरी भागात आठ बालरोगतज्ज्ञ!
शहरी भागात जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय वाशिम येथे सहा आणि कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दोन बालरोग तज्ज्ञ आहेत. वाशिम व कारंजा येथे सरकारी रुग्णालयांत बालकांसाठी बेडची व्यवस्थाही केली.
०००००००००००००००
कार्यरत डॉक्टरांना प्रशिक्षण
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, आदींना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. बालकांमधील कोरोनाची लक्षणे कशी ओळखावी, उपचार कोणते करावे, काळजी काय घ्यावी यासह कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक ते प्रशिक्षण एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.
००००००००००
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्रांत बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नाहीत. तथापि, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कार्यरत डॉक्टर, कर्मचाऱ्यांना तज्ज्ञांकडून आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम