१३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे उपलब्ध वेळेचा उमेदवार पुरेपूर वापर करून प्रचारावर भर देत आहे. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात १४८७ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. परिणामी प्रत्यक्षात आता १४८७ जागांसाठी तीन हजार २२६ उमेदवार निवडणूक रिंगणात भाग्य आजमावत आहे. काही ठिकाणी माेठ्या प्रमाणात युवक रिंगणात उतरलेले दिसून येत आहे. शेलूबाजार येथे गत निवडणुकीतील एकही सदस्य यंदाच्या निवडणुकीत उतरलेला दिसून येत नाही. १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. प्रचार संपण्यास चार दिवस बाकी असल्याने प्रशासकीय पातळीवर मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी निवडणूक विभाग करत असून, कर्मचाऱ्यांचेही प्रशिक्षणही घेण्यात येत आहे.
-------------
प्रत्यक्ष निवडणूक हाेणाऱ्या ग्रामपंचायती
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत. त्यामुळे १५२ ग्रामपंचायतीमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १९, रिसाेड तालुक्यातील ३२, मालेगाव तालुक्यातील २८, मंगरूळपीर तालुक्यातील २५, कारंजा तालुक्यातील २७ व मानाेरा तालुकयातील २१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येथील उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे.
-----------
जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध
४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. यात ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्या. यामध्ये वाशिम तालुक्यातील ५, रिसाेड तालुक्यातील २, मालेगाव तालुक्यातील २, कारंजा तालुक्यातील २ व मानाेरा तालुक्यातील १ ग्रामपंचायतचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील तोंडगाव, कोंडाळा झामरे, सावरगाव जिरे, भोयता, किनखेडा या सर्वाधिक ग्रा.पं. आहेत.
-----------
निवडणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण ५५० प्रभाग असून, १४८७ जागा आहेत. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता नागरिकांनीसुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील विंचनकर यांनी केले आहे. तसेच निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्णत्वाकडे दिसून येत आहे.