वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मेपर्यंत जिल्ह्यांतर्गत प्रवासावर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठीच इतर जिल्ह्यांमध्ये जाता येत आहे. त्याकरिता नागरिकांना पोलिसांचा ई-पास घेणे आवश्यक आहे. ई-पाससाठी सध्या रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार अशी दोनच कारणं जास्त प्रमाणावर दिली जात आहेत.
संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात २३ ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. बाहेर जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्यांना ई-पासवर जिल्ह्यात प्रवेश देण्यात येतो. जिल्ह्याच्या सीमेवरील ६० ठिकाणी रस्ते संबंधित गावाच्या सहमतीने बंद करण्यात आले आहेत. ३० एप्रिलनंतर पुन्हा १५ दिवसांसाठी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातही ई-पास मिळविण्यासाठी काही ठरावीक नियम घालून दिले आहेत. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू (आई, वडील, भाऊ, बहीण, चुलत भाऊ-बहीण, दीर, मेहुणे) झाल्यास आणि कुणी गंभीर आजारी असल्यासच ई-पास दिला जातो. त्यासाठी नागरिकांनी नातेसंबंध व आजारपणाचा पुरावा बाळगणे आवश्यक आहे, अशा कारणांसाठी राज्यांतर्गत प्रवासासाठी पास देण्यात येतो. पोलिसांनी वेबसाइट तयार केली असून, त्यावर अर्ज करून ई-पास मिळवता येईल.
किती तासांत मिळतो ई-पास
ई-पाससाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर साधारणत: दोन ते तीन तासांत पास उपलब्ध होतो.
ही कागदपत्रे हवीत
ई-पाससाठी कराव्या लागणाऱ्या अर्जासोबत तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटोही जोडावा लागणार आहे. फोटोची साईज २०० केबीपेक्षा जास्त नसावी. फोटो ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना आदी कागदपत्रे देता येऊ शकतात.
तीच ती कारणे
ई-पाससाठी रुग्णालयात जायचे आहे, हे कारण ठरलेले आहे, तर काही नागरिकांकडून अंत्यसंस्काराला जायचे आहे असे कारणसुद्धा देण्यात येते.
ई-पाससाठी असा करावा अर्ज
ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी कोविड-१९ महापोलीसच्या वेबसाइटवर जाऊन ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा. त्यानंतर स्वतःचे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून, मोबाइल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी. त्यानंतर स्वतःचा फोटो, आधार कार्ड, मेडिकल रिपोर्ट, कंपनीचे ओळखपत्र जोडावे. त्यानंतर सर्व कागदपत्रे तपासून त्या विभागाच्या पोलीस यंत्रणेकडून ई-पास दिला जाईल.