वाशिम - केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस देण्याची योजना सुरू केली; परंतु कोरोनाची भीती आलता लोकांत नसल्याने दोन महिने उलटत आले तरी जिल्ह्यात या डोससाठी पात्र असलेल्या ५ लाख ७४ हजार ३७४ नागरिकांपैकी केवळ ८० हजार ७१३ लोकांनी बुस्टर डोसचा लाभ घेतला आहे. मोफत बुस्टरची मुदत ५ दिवसांत संपणार असतानाही जिल्ह्यातील ४ लाख ९३ हजार ६८१ पात्र नागरिक या डोसपासून वंचितच आहेत.
केंद्र शासनाने १५ जुलैपासून ७५ दिवस १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली होती. वाशिम जिल्ह्यात शासनाच्या घोषणेनुसार १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर देण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले ५ लाख ७४ हजार ३७४ नागरिक मोफत बुस्टरसाठी पात्र आहेत. तथापि, गत ७० दिवसांत जिल्ह्यातील केवळ ८० हजार ७१३ लोकांनी बुस्टर डोसचा लाभ घेतला आहे. अद्यापही ४ लाख ९३ हजार ६८१ पात्र नागरिक या डोसपासून वंचितच आहेत. आता मोफत बुस्टरची मुदत ५ दिवसांत अर्थात ३० सप्टेंबरला संपणार आहे. त्यामुळे या पाच दिवसांत अधिकाधिक लोकांनी मोफत बुस्टर डाेस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
१८ वर्षावरील लसीकरणाची स्थितीएकूण लाभार्थी - ९,८२,२४८पहिला डाेस - ८,१६,८८०दुसरा डोस - ६,७१,१५७बुस्टर डोससाठी पात्र - ५,७४,३९४बुस्टर डोस - ८०,७१३