वाशिम : दिवसेंदिवस खासगीकरणावर भर दिला जात असल्याने समाजबांधवांना शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याकारणाने जागतिक दर्जाचे विद्यापीठ नागपूर येथे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू तथा भारतीय बाैद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले.
शहरातील नालंदानगरमधील त्रिरत्न बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भंते प्रज्ञापाल भंते आनंदपाल प्रदेक्षाध्यक्ष हनुमंते जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड व मान्यवरांची उपस्थिती होती.
राजरत्न आंबेडकर म्हणाले की, बाबासाहेबांनी बाैद्ध धम्माचे महत्त्व ओळखून जगातील बाैद्ध राष्ट्राचे संघटन करून वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिष्टच्या स्थापनेचे प्रयत्न केले आणी त्याला जोडण्यासाठी भारतीय बाैद्ध महासभेची स्थापना केली; परंतु लवकरच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले; सोबतच वर्ल्ड फेलोशिपसोबतचे संबंधही तुटले तब्बल ६० वर्षांनंतर आपण ते संबध जोडून जागतिक संघटनेच्या संपर्कात आलो. याच संघटनेच्या माध्यमातुन नागपुर येथे जागतिक दर्जाचे विद्यापीठ निर्माण करीत असल्याचे सांगितले. यावेळी समाजसेवक माणिकराव सोनुने, मधुकरराव जुमडे, दाैलत हिवराळे, अनिल कांबळे, बबनराव खिल्लारे, राजकुमार पडघान, अजय ढवळे, उपासिका अरुणा ताजने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.