मंगरुळपीर (जि. वाशिम): तालुक्यात कोणत्याच शाळेत सीबीएसई पॅटर्नला मान्यता नसल्याचे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शनिवारी स्पष्ट केले. या संदर्भात लोकमतमध्ये २६ जून रोजी अनधिकृत शाळांकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. जिल्हाधिकार्यांनी याची दखल घेत मंगरुळपीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचेही पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकार्यांनी सांगितले. मंगरुळपीर शहरातील कुठल्याही शाळेला सीबीएसई पॅटर्नची मान्यता नसतानाही अनेक शाळा सीबीएसई पॅटर्न असल्याचे दाखवून विद्यार्थ्यांंचे प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न काही शाळा करीत आहेत. पालक वर्गाकडून त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैसाही वसूल केला जात आहे. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे पहिली किंवा इतर काही वर्गांंना मान्यता नसतानाही काही शाळा सर्रासपणे विद्यार्थ्यांंंचे प्रवेश मिळवून पालकवर्गाची दिशाभूल करीत आहेत. यंदाच्या शैक्षणिक सत्राला नुकतीच सुरुवात झाली आहे. अद्यापही शहरातील अनेक शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. विविध प्रकारे पालकवर्गाला आकर्षित करून मोठय़ा प्रमाणात प्रवेश मिळविण्याची स्पर्धाच शहरात सुरू आहे. शहरातील स्व. महादुजी मनवर बहूद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने या संदर्भात संबंधित विभाग व अधिकार्यांना वेळोवेळी निवेदन देऊन कारवाईची मागणीही करण्यात आली; परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर या संदर्भात लोकमतमध्ये २६ जूनच्या अंकात अनधिकृत शाळांकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. याची दखल वाशिम जिल्हाधिकार्यांनी घेतली आणि मंगरुळपीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला या संदर्भात तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर शिक्षण विभागाने शहरात कोणत्याही शाळेत सीबीएसई पॅटर्नला मान्यता नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, नर्सरी, एलकेजी आणि यूकेजी या वर्गांंसाठी कुठल्याही मान्यतेची गरज नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे; परंतु सीबीएसईच्या नावाचा आधार घेण्यासाठी मात्र त्यांना या मंडळाची मान्यता असणे आवश्यकच आहे.
मंगरुळपीरमधील शाळांत सीबीएसई पॅटर्न नाहीच
By admin | Published: June 29, 2015 1:17 AM