लोणी खु.ते कु-हा रस्त्यावरील जंगलातील दोन नद्यांपैकी एका ठिकाणी पूल बांधण्यात आला; मात्र महत्त्वाचा पूल बांधण्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही. चिचांबाभर, जवळा, मांडवा, मोहजाबंदी, कुऱ्हा आणि आसोला या सहा गावांतील नागरिकांच्या सोयीसाठी लोणी खु. ते कुऱ्हा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. वरील गावातील ग्रामस्थांना औरंगाबाद, नाशिक, पुणे यासारख्या औद्योगिक शहरांकडे जाण्यासाठी हाच जवळचा मार्ग आहे. सदर गावातील ग्रामस्थांना लोणी खुर्दनजीकच्या नदीवरील पुलाअभावी जवळपास ५० किलोमीटर दूरवरचा फेरफटका मारावा लागत आहे. विशेष म्हणजे सदर मार्ग हा घनदाट जंगलामधून जात असल्याने या रस्त्याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, असा सूर नागरिकांतून उमटत आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष पुरवून पुलाची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
.................
कोट :
लोणी खु. ते कुऱ्हा या रस्ता कामासाठी मंजूर झालेला निधी आतापर्यंत खर्च करण्यात आला. आता निधी नसल्याने जंगलातील नदीवरील पुलाचे काम रखडले आहे.
-एस.जे. चव्हाण, कनिष्ठ अभियंता, पीएमजेएसवाय, वाशिम