रिसोड : ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या ११ कलमी कार्यक्रमाची रिसोड तालुक्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने पंचायत समिती सभापती-उपसभापतींसह सदस्यही आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी २६ डिसेंबरला गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
वाशिम जिल्ह्यात सन २०१४ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे अपूर्ण आहेत. यामध्ये नाला सरळीकरण, पाणंद रस्ते, सिंचन विहिरींसह इतर विकासात्मक कामांचा समावेश आहे. ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक चालढकल करून विकास कामांना खीळ घालत असल्याचा आरोप पंचायत समिती सभापतींसह सदस्यांनी गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केला. डॉ. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला अपूर्ण कामे त्वरित सुरू करून फडणवीस सरकारच्या ग्रामीण विकासाला मोठा हातभार लावणाºया महत्वाकांक्षी अशा ११ कलमी कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना फोनद्वारे दिले, अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती छाया सुनील पाटील यांनी दिली. रिसोड पंचायत समितीच्या यशोदा भाग्यवंत, ज्योती मोरे, अंजली शिंदे, मंगला खरात, कमल करंगे, कावेरी अवचार, चंद्रकला बांगरे, श्रीकांत कोरडे, एकनाथ घुकसे, नंदुभाऊ घुगे या पंचायत समिती सदस्यांसह जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या जवळपास ३५ ते ४० सदस्यांनी गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली.
लवकरच वाशिम जिल्यातील सर्व पंचायत समिती सभापतींसह दहा सदस्यांची विशेष बैठक मंत्रालयात घेण्यात येणार असून या बैठकीला मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, रोजगार हमी मंत्री ना.जयकुमार रावल आदींची उपस्थिती राहिल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिली, असेही सभापती छाया पाटील यांनी सांगितले.