राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्यांद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी शासनाने राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्याची घोषणा केली आहे. कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील कोरोनामुक्त ग्रामपंचायतींनी स्वमूल्यांकन करून पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करायचा आहे. यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना गुणानुक्रम पद्धतीने १० ग्रामपंचायतींची निवड करून त्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर आहेत. जिल्हास्तरावर या प्रस्तावांची पडताळणी करून प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायतींची निवड करून त्यांचे प्रस्ताव विभागस्तरावर पाठवायचे आहेत. आता शासनाच्या घोषणेला २० दिवस उलटून गेले तरी जिल्ह्यातील सहापैकी एकाही पंचायत समितीकडून जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला नाही.
-------------------
प्रत्येक विभागातून आठ बक्षिसे
कोरोनामुक्त गाव स्पर्धेत राज्यातील सहा महसुली विभागात प्रत्येकी तीनप्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षिसे दिली जातील. शिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना लेखाशीर्ष पंचवीस पंधरा (२५१५) व तीस चौपन्न (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत.
-------------------
ग्रामपंचायत स्तरावर पाच पथकांची स्थापना
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर पाच पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवावयाचे आहेत. यामध्ये ग्रामपंचायत प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करून त्यासाठी कार्यवाही करणारे पथक, कोरोना तपासणीसाठी व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाचे पथक, कोविड हेल्पलाईन पथक आणि लसीकरण पथक यांचा समावेश राहणार आहे.
-------------------
(01६ँ10)
कोट : गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या ग्रामपंचायतीअंतर्गत कोणालाही कोरोना संसर्ग झालेला नाही. कोरोनामुक्तीसाठी ग्रामसचिव आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने व्यापक उपाय केले जात आहेत. शिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेतील सर्व निकषांची अमलबजावणी करण्यात येत असून, स्पर्धेबाबतची विस्तृत माहिती घेऊन लवकरच पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर केला जाईल.
- रामहरी सावके
सरपंच, खंडाळा (वाशिम)
------
कोट : कोरोनामुक्त गाव स्पर्धेच्या घोषणेपूर्वीच आमची ग्रामपंचायत कोरोनामुक्त झाली असून, गावात कोरोनाचा पुन्हा शिरकाव होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोरोनामुक्त गाव स्पर्धेतील सर्व निकषांची अंमलबजावणी करण्यात येत असून, स्पर्धेबाबतची विस्तृत माहिती घेऊन लवकरच पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर केला जाईल.
- राज चौधरी
सरपंच, उंबर्डा बाजार (कारंजा)
--------
कोट : कोरोनामुक्त गाव स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरावर अद्याप एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. प्रत्येक पंचायत समितीकडून प्रत्येकी १० प्रस्ताव आल्यानंतर त्यांची पडताळणी करून विभागस्तरावर प्रत्येक तालुक्यातील तीन याप्रमाणे १८ प्रस्ताव पाठविले जातील. प्रस्ताव सादर करण्याबाबत पंचायत समित्यांना पत्र देण्यात आले आहे.
- उज्ज्वल पुरी, वरिष्ठ साहाय्यक
पंचायत विभाग, जिल्हा परिषद, वाशिम