लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८ मध्ये राज्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे संभाव्य चाराटंचाईची धग कमी करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गटांना मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांच्या खरेदीसाठी ५० टक्के अनुदान मिळणार होते. मात्र, यासाठी जिल्ह्यात एकही प्रस्ताव प्राप्त नसल्याने आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पात्र शेतकरी गटांना अर्ज करता येईल.सन २०१८ च्या खरिप हंगामात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यात तसेच याव्यतिरिक्त २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ तर ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती राज्य शासनाने यापूर्वीच घोषित केलेली आहे. भविष्यात चारा टंचाई जाणवू नये याकरीता हिरव्या वैरणीचे मुल्यसंवर्धन करून पोषक ‘मुरघास’ तयार करण्याला प्राधान्य दिले जाते. नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्पात जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत दुष्काळी भागातील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गटांना मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांच्या खरेदीसाठी ५० टक्के अनुदान दिले जाते. मात्र, यासाठी जानेवारी त फेब्रुवारी अशा दोन महिन्यात एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. आता लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणुक निकालानंतरच अर्थात आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पात्र शेतकरी बचत गट व कंपन्यांना अर्ज करता येतील.
मुरघास बनविण्याच्या यंत्र खरेदीसाठी एकही प्रस्ताव नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 2:05 PM