जिल्ह्यात कोरोना संसर्गाने झालेल्या मृत्यूच्या आकड्यात कमालीची वाढ झाली आहे. असे असताना खरा आकडा दडविण्यात येत असून प्रत्यक्ष झालेले मृत्यू आणि पोर्टलवर दाखविण्यात येत असलेल्या मृत्यूंमध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणेच्या लेखी जिल्ह्यात कोरोना महामारीचा शिरकाव झाल्यापासून १ एप्रिल २०२१ पर्यंत २९६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात २१ मे २०२१ पर्यंत १११ मृतांची वाढ झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात मात्र १ एप्रिल ते २१ मे या कालावधीत वाशिम नगर परिषदेच्या यंत्रणेने ३७५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. आकडेवारीतील या घोळात २६४ मृतदेहांचा मेळ लागणे अशक्य झाले आहे.
...................
ही पहा आकड्यातील तफावत...
जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यू - ६७१
पोर्टलवरील नोंद - ४०७
..............
सर्वाधिक बळी वाशिममध्ये
जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत वाशिम शहर व परिसरातील अधिक व्यक्ती कोरोना विषाणू संसर्गाने मरण पावल्या आहेत. संबंधितांवर स्थानिक मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
.................
पालिकेत मृत्यूंची नोंद
शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यास चिताग्नी देण्याची जबाबदारी वाशिम नगर पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे. यामुळे कोणत्या दिवशी किती मृत्यू झाले, याची नोंद पालिकेत केली जात आहे.
.............
जिल्हा परिषदेत वाॅर रूम नाही
जिल्हा परिषदेत कोरोना वाॅर रूम नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जिल्ह्यात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची कुठलीच नोंद घेतली जात नाही.
..............
...तर फटका बसू शकतो
कोरोना बाधितांच्या मृत्यूंची लपवाछपवी करून आरोग्य यंत्रणेला नेमके साधायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. केवळ कामगिरीतील उणीव उघड होऊ नये, यासाठी तर यंत्रणेकडून हा आटापिटा केला जात नसावा ना, असाही सूर नागरिकांमधून उमटत आहे.
कोरोना मृत्यूंची खरी आकडेवारी सरकारपर्यंत पोहोचत नसल्याने कोरोना संसर्गावर व या संकटाच्या घेऱ्यात सापडून होत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखणे अशक्य होणार आहे. यामुळे मोठा फटका बसू शकतो.
....................
कोट :
कोरोना विषाणू संसर्गाने शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू झाल्यास तत्काळ माहिती पोर्टलवर अपडेट केली जाते; मात्र खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे झालेल्या मृत्यूंचे आकडे कळविले नव्हते. आता माहिती प्राप्त झाली असून २ ते दिवसांत तशी आकडेवारी अपडेट केली जाईल.
- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम