वाशिम : सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याची दखल घेत मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने २९ मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ३१ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, ३० मार्च रोजी कृषी विभागाने पुन्हा एकदा शेतकºयांची बैठक बोलाविली आहे.
शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत बियाणे उत्पादन व वितरण या दोन्ही बाबीसाठी अनुदान दिले जाते. गत सात वर्षांपासून बियाणे उत्पादन व वितरण या दोन्ही बाबीसाठीचे अनुदान शासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळांना अनुदान देण्यात येते. वाशिम जिल्ह्यात सन २०१० पासून सुमारे १८ शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळाने हजारो क्विंटल बियाणे उत्पादन करीत आहेत. आतापर्यंत बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळालेले आहे. पूर्वानुभव लक्षात घेता सन २०१६-१७ मध्ये ९९६.७० क्विंटल हरभरा बियाणे उत्पादन केले. त्यापोटी बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळणे अपेक्षीत आहे, असे शेतकरी उत्पादक गट व कंपन्यांनी निवेदनात म्हटले आहे. सदर अनुदान मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींसह कृषी विभागाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात आला. अनुदान मिळाले नसल्याने उत्पादक गट व कंपनीच्या शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे निवेदन देत अनुदान देण्याची मागणी केली. यावर कोणताच सकारात्मक निर्णय न झाल्याने २२ मार्च रोजी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना निवेदन व स्मरणपत्र देत ३० मार्चपर्यंत अनुदान न मिळाल्यास ३१ मार्च रोजी खामगाव येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा बियाणे उत्पादक गट व कंपनीच्या शेतकऱ्यांनी दिला. याची दखल घेत शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे निर्देश कृषी, पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव डॉ. किरण पाटील यांनी २६ मार्च रोजी वाशिम, बुलडाणा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले होते. या निर्देश पत्रात मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देण्यात आला. त्या अनुषंगाने २९ मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बुलडाणा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, वाशिम येथील प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे, ‘आत्मा’ कार्यालयाच्या प्रभारी प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपसंचालक आर.एस. कदम, तंत्र सहायक टी.पी. आरू आदींनी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी बियाणे उत्पादन करताना आलेल्या अडचणी व बँक, पतसंस्थेंकडून घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाची माहिती शेतकऱ्यांनी दिली. बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळाले नाही तर कर्जाची परतफेड कशी करावी, अशी आपबिती शेतकऱ्यांनी कथन केली. या अनुदानासंदर्भात केवळ आश्वासन मिळाले असून, ठोस तोडगा न निघाल्याने चर्चेची ही प्राथमिक बैठक फिस्कटली. दरम्यान, ३० मार्च रोजी पुन्हा शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलाविण्यात आले आहे. या चर्चेत बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनी बाळखेड, बालाजी शेतकरी उत्पादक गट किनखेडा, संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, बाळनाथ शेतकरी उत्पादक गट, हरिओम शेतकरी उत्पादक कंपनी, देवळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी माऊली शेतकरी उत्पादक कंपनी, परिवर्तन शेतकरी उत्पादक कंपनी यासह बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतकरी उत्पादक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ३० मार्च रोजीही ठोस तोडगा न निघाल्यास ३१ मार्च रोजी खामगाव येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशाऱ्यावर ठाम असल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.