मंगरुळपीर: शहरातील नागरिकांना गेल्या २० दिवसांपासून पाणी पुरवठाच झाला नसून, हातपंपही कोरडे पडल्याने नागरिकांची पाण्याअभावी मोठे हाल सुरू आहेत. पालिका प्रशासन मात्र सुस्त बसले असून, पदाधिकारीही पर्यायी उपाय योजनांबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.
मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा धरण आटले आहे. मृतसाठ्याच्या भरवशावर नागरिकांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रकार दोन महिन्यांपासून पालिका करीत आहे. त्यामुळे सुरुवातीला आठ दिवसांआड, नंतर १० दिवसांआड आणि १५ दिवसांआड शहरात पाणी पुरवठा करण्यात येत होता. नागरिकांना पर्याय नसल्याने मिळेल तेव्हा पाणी भरून काटकसरीने वापर करणे नागरिकांनी सुरू केले; परंतु आता मात्र नागरिकांना २० दिवसांच्या कालावधीतही पाणी पुरवठा न झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. खाजगी टँकरचा आधार घेणे नागरिकांनी सुरू केल्यानंतर आता खाजगी टँकरधारकांनीही आपले दर वाढविले आहेत. अवघ्या २ हजार लीटरचे टँकर २०० ते २२५ रुपयांपर्यंत विकले जाऊ लागले आहे. दुसरीकडे पालिकेचे पदाधिकारी मात्र निकामीच ठरेल, अशा ४ कोटी रुपयांच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेवर लक्ष केंद्रीत करून आहेत. विशेष म्हणजे सोनल धरणातून मोतसावंगा धरणापर्यंत पाणी आणण्याच्या या योजनेला मंगरुळपीर तालुक्यातील १२ गावच्या शेतकरी, ग्रामस्थांचा विरोध असून, तो मोडून काढण्यात आला तरी, ही योजना सुरू होण्यास आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. तेव्हापर्यंत नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न सर्व नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पर्यायी उपाय योजनांसाठी पालिका प्रशासन आणि पदाधिकाºयांनी एकही बैठक आयोजित केल्याचे ऐकिवात नाही किंवा यासाठी पाठपुरावा करण्याचेही प्रयत्न झाले नाहीत. केवळ सोनल ते मोतसावंगा पाणी आणण्याच्या योजनेवरच पदाधिकारी का एवढे लक्ष देत आहेत, तेसुद्धा कळायला मार्ग नाही.