ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून असतात. सर्दी, खोकला, ताप आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घेतात. परंतु पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल. या भीतीने नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यास कुचराई करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातून सरळ तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविले जाते. शिवाय मृत्यू ओढवल्यास नातेवाइकांना मृतदेह मिळत नसल्यामुळे घरी उपचार करण्यावर प्राधान्य देत असल्याचेही दिसून येते. सध्या ग्रामीण भागात ‘व्हायरल फ्ल्यू’ ने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, टायफाॅइडचे रुग्णाचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या अल्प प्रमाणात असल्यामुळे रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही. शिवाय दवाखान्यात गर्दी वाढलेली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टर खबरदारी बाळगत आहेत. कोरोनाच्या चाचणीशिवाय उपचार करण्यास तयार होत नाहीत.
ग्रामीण भागात उच्च शिक्षित डॉक्टर वैद्यकीय सेवा देण्यास कुचराई करतात. शिवाय ग्रामीण भागात उच्च शिक्षित डॉक्टर दवाखाने उघडत नाही. शहरी भागात वैद्यकीय सेवा देण्यास प्राथमिकता देतात. ग्रामीण भागात बीएएसमएस, बीएचएमएस आदी अर्हता धारक डॉक्टर दवाखाने उघडून वैद्यकीय सेवा पुरवितात. तालुक्याच्या ठिकाणी चार-पाच एमबीबीएस डॉक्टर वैद्यकीय सेवा पुरवतात. हजारो लोकसंख्येच्या मागे डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे वेळेवर योग्य उपचार मिळत नाही. अशावेळी रुग्ण बोगस डॉक्टरांकडून उपचार करुन घेत असल्याचेही दिसत आहे.