वाशिम : तवेरा आणि इंडिका या चारचाकी वाहनांमध्ये येवून गोठ्यात बांधलेल्या गायी चोरणाऱ्या चोरट्यांवर ४ जुलैच्या रात्री आरिष्ट ओढवले. एक गाय गाडीत टाकून पळ काढणाऱ्या चोरट्यांच्या गाड्यांमागे पोलिसांनी त्यांची गाडी लावून सिनेस्टाईल पाठलाग केला. लोखंडी खिळ्यांच्या स्ट्रीपमुळे वाहन पम्चर होवूनही चोरट्यांनी धूम ठोकली. पुढे लावलेले बॅरिकेट्स तोडून जंगलातील अंधारात ते दोन्ही गाड्या सोडून पसार झाले. पोलिसांनी गाय आणि दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मेडशीसह नजिकच्या गावांमध्ये गोवंश चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. गाय, बैल, म्हैस, शेळ्या रात्रीतून लंपास होत असताना चोरट्यांचा मात्र सुगावा लागणे अशक्य झाले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून काहींनी गुरांच्या गोठ्यातच झोपणे सुरू केले.
दरम्यान, पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचा निर्धार केला. अशात ४ जुलैच्या रात्री दोन संशयित वाहने पोलिसांना आढळून आली. त्यामुळे या वाहनांचा पाठलाग करणे सुरू केले असता चोरट्यांनी धूम ठोकली. वायरलेसद्वारे एकमेकांशी संपर्कात राहून लोखंडी खिळ्यांच्या स्ट्रीपद्वारे चोरट्यांचे वाहन पम्चर करण्यात आले. तसेच पुढे सावरखेड टोलनाक्यावर बॅरिकेट्स देखील लावण्यात आले. मात्र, चोरट्यांनी वाहन पम्चर होवूनही न थांबता बॅरिकेट्स देखील तोडून पळ काढला. अखेर पातूरच्या घाटात वाहने थांबवून चोरट्यांनी जंगलातील अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.
पोलिसांनी याप्रकरणी तवेरा (एम.एच.०४ ईएस ५८१), इंडिया (एम.एच. ०४ जीडी २३०३) ही दोन वाहने आणि तवेरात मागच्या बाजूने डांबून ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या गायीला ताब्यात घेतले. तसेच अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्याकामी पथक रवाना केले.
...अन् पोलिसांचे वाहनही झाले पम्चर
चोरट्यांच्या वाहनास ‘ब्रेक’ लावण्यासाठी पोलिसांनी लोखंडी खिळ्यांच्या स्ट्रिपचा वापर केला. त्यामुळे चोरट्यांचे वाहन पम्चर झाले. मात्र, त्यांचा पाठलाग करत असताना पोलिसांचे वाहन देखील पम्चर होवून कारवाईत अडथळा निर्माण झाला.
पाच ते सहा चोरट्यांची टोळी
गुरे चोरण्याचा गोरखधंदा अवलंबिलेल्या पाच ते सहा चोरट्यांची टोळी असून ४ जुलै रोजी रात्री पोलिस पाठलाग करत असताना हे सर्वजण पातूरच्या घाटातील जंगलात पसार झाले. पोलिस कसून चाैकशी करित असून लवकरच हे चोरटे जेरबंद होतील, असा विश्वास ठाणेदार संजय चाैधरी यांनी व्यक्त केला.