लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात मीटर रीडिंग न घेता दिले जाणारे वीज बिल, तसेच वीज बिलांमधील चुकांविषयी वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारींचा निपटारा विद्युत वितरण कंपनीने १५ दिवसांच्या आत करावा. तसेच या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित ग्राहकाला देण्यात यावी, अशी मागणी शुक्रवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या बैठकीत वीजग्राहकांच्या विविध समस्यांवर उहापोह करण्यात आला. यात ग्रामीण भागात अनेक रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. याठिकाणी पर्यायी रोहित्र उभारणी करण्याची कार्यवाही तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. याविषयी माहिती देताना महावितरणचे उप कार्यकारी अभियंता एस. एस. देशपांडे म्हणाले, जिल्ह्यात एचव्हीडीएस योजनेंतर्गत एक किंवा दोन कृषिपंप जोडणीसाठी स्वतंत्र रोहित्र देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे वीज पुरवठा योग्य दाबाने होण्यास मदत होईल. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन या तक्रारींचा निपटारा तातडीने करण्याच्या सूचना केल्या. त्याशिवाय हॉटेलमधील उघड्यावरचे खाद्य पदार्थ, पिण्याचे पाणी याची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागाने करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही वानखेडे यांनी केल्या. बैठकीला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, वाशिमचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक कैलास भरकाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, अन्न सुरक्षा अधिकारी नि. रा. ताथोड यांच्यासह प्रा. वीरेंद्र ठाकूर, डॉ. सागर आंबेकर, डॉ. राम बाजड, गजानन साळी, सुधीर घोडचर, कृष्णा चौधरी, भागवत कोल्हे, नामदेव बोरचाटे, संजय राऊत, प्रसन्न पळसकर, अभय खेडकर, हीना कौसर मो. मुबरशीर, अलका पाटील, प्रा. डॉ. शुभांगी दामले, विकास गवळी, डॉ. एम. एम. संचेती, धनंजय जतकर, प्रवीण पाटील वानखडे, सुधीर देशपांडे, वनमाला पेंढारकर हे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
वीज ग्राहकांच्या तक्रारींवर उहापोह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 4:40 PM