वाशिम: शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटाव मोहिमेंतर्गत तिसर्या दिवशी रविवारी पाच धार्मिक स्थळं हटविण्यात आली. गत तीन दिवसांत एकूण १२ अनधिकृत धार्मिक स्थळं हटविली आहेत. २९ सप्टेंबर २00९ नंतर उभारण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार वाशिम पालिकेने शहरातील धार्मिक स्थळांची पाहणी केली होती. या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने शुक्रवारला अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला. या मोहिमेंतर्गत जिल्हा प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने पहिल्या दिवशी चार, दुसर्या दिवशी तीन आणि तिसर्या दिवशी अर्थात रविवारी पाच अशा एकूण १२ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. रविवारी शिवाजी चौकातील दोन, काळे फैल भागातील एक, चंडिका वेस भागातील एक व शुक्रवारपेठ भागातील एक, असे एकूण पाच अनधिकृत धार्मिक स्थळं पोलीस बंदोबस्तात हटविली. वाशिम शहरात एकूण १८ अनधिकृत धार्मिक स्थळं असल्याचे प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. आता उर्वरित सहा अनधिकृत धार्मिक स्थळं हटविण्यात येणार आहेत. आतापर्यंंत शहरात संपूर्ण मोहीम शांततेत पार पडली आहे. यापुढेदेखील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून अशीच शांतता ठेवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तिस-या दिवशी पाच धार्मिक स्थळं हटविले
By admin | Published: June 27, 2016 2:24 AM