वाशिम : गत वर्षभरात जिल्ह्यात तिसऱ्यांदा एकही कोरोना रुग्ण आढळून आला नसल्याची नोंद सोमवार, २३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. सोमवारी एकही रुग्ण आढळून न आल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे दोन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण कोरोनाबाधित रुग्ण ७१४३ होते तर एकूण १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारांवर रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यापासून दुसरी लाट ओसरत असून, ऑगस्ट महिन्यात तर सरासरी दोन, तीन असे रुग्ण आढळून येत आहेत. ऑगस्ट महिन्यातच तिसऱ्यांदा २३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. दोन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात ४१७०० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१०४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१३ सक्रिय रुग्ण
सोमवारच्या अहवालानुसार नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तर दोन जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या गृहविलगीकरणात असे एकूण १३ रुग्ण आहेत. एकही रुग्ण हा कोविड हॉस्पिटल किंवा सरकारी दवाखान्यात भरती नाही, हे विशेष. १३ रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.